R Praggnanandhaa : आता जग भारतीय बुद्धिबळपटूंची दखल घेईल – प्रज्ञानंद

बुद्धिबळ विश्वचषकात उपविजेतेपद पटकावलंय यावर प्रज्ञानंदचा अजून विश्वास बसलेला नाही.

205
R Praggnanandhaa : आता जग भारतीय बुद्धिबळपटूंची दखल घेईल - प्रज्ञानंद

ऋजुता लुकतुके

अठरा वर्षीय प्रज्ञानंदने (R Praggnanandhaa) बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम फेरीत मॅग्नस कार्लसनने त्याचा टायब्रेकरवर पराभव केला असला तरी इथपर्यंत पोहोचताना त्याने केलेल्या दमदार कामगिरीचं कौतुक होतंय. पण, स्वत: प्रज्ञानंदला त्याच्या कामगिरीची जगाने कशी दखल घेतलीय याची कल्पना नाही.

अझरबैजानमधील बाकूमधून पीटीआयशी बोलताना प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) काहीसा लाजतच होता. ‘मी अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो याचा आनंदच आहे. तिथे जिंकता आलं नाही, तरी बुद्धिबळात जिंकणं – हरणं सुरूच राहतं,’ असं तो म्हणाला. इतकंच नाही तर त्याच्या कामगिरीचं महत्त्वंही त्याला अजून समजलेलं नाही. ‘आता तरी मी नेमकं काय केलंय हे मला माहीत नाही. पण, हळू हळू समजेल बहुतेक,’ इतकंच तो म्हणाला.

पण, एक गोष्ट मात्र तो ठामपणे सांगतो. ‘माझ्या (R Praggnanandhaa) कामगिरीनंतर आता जगाला भारतीय बुद्धिबळ काय आहे हे कळेल.’

प्रज्ञानंदने अंतिम फेरीत मॅग्नस कार्लसनला चांगली लढत दिली. पारंपरिक बुद्धिबळाचे दोन सामने त्याने बरोबरीत सोडवले. तर उपउपान्त्य आणि उपान्त्य फेरीत त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूंचा पराभव केला. जपानचे ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा यांचा पराभव केला, तेव्हाच मॅग्नस कार्लसनने त्याच्या (R Praggnanandhaa) खेळाची दखल घेतली होती.

प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) आपला उपान्त्य फेरीचा सामना खेळत असतानाच कार्लसन काही क्षण त्याची भेट घेऊन गेला. आणि त्याने प्रज्ञानंदचं अभिनंदन केलं.

या स्पर्धेतील उपविजेतेपदामुळे प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) दिग्गज बुद्धिबळपटूंच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. बॉबी फिशर आणि मॅग्नल कार्लसन यांच्या मागोमाग कँडिडेट्स कप या बुद्धिबळातील मानाच्या स्पर्धेत थेट पात्रता मिळवणारा तो सर्वात लहान बुद्धिबळपटू ठरला आहे. प्रग्यानंदचा या खेळातील आदर्श विश्वनाथन आनंद हा दुसरा आणि एकमेव भारतीय आहे ज्याने ही कामगिरी केली आहे.

(हेही वाचा – Wrestling Federation of India : भारतीय कुस्ती महासंघ निलंबित)

खरंतर प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) मागचे दोन महिने स्पर्धांच्या निमित्ताने जगभर प्रवास करतोय. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेची तयारी करण्यासाठी त्याला वेळच मिळाला नाही. त्याच्याच शब्दात सांगायचं तर, ‘फक्त एक आठवडा स्पर्धेपूर्वी मोकळा मिळाला. त्या वेळेत मी प्रतिस्पर्धी खेळाडूची खेळण्याची पद्धत समजून घेतली. मॅग्नस कार्लसनबरोबर अलीकडेच मी काही सामने खेळलो आहे. त्यामुळे अंतिम फेरीची तयारीही सोपी गेली. अर्थात, प्रत्यक्ष सामन्यात मी मनासारखा खेळ करू शकलो नाही. पण, ते स्पर्धेत घडतंच.’

बुद्धिबळात मन आणि बुद्धी यांचा कस लागतो. पण, त्याचबरोबर मानसिक थकवा न जाणवणंही महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रग्यानंद बॅडमिंटन आणि टेबलटेनिस खेळतो.

आणि प्रत्येक बुद्धिबळाचा (R Praggnanandhaa) सामना हा एक शिकण्याची संधी आहे असंच तो या वयात समजतो. ‘मी कार्लसनबरोबर ग्लोबल लीगमध्ये खेळलो आहे. त्याच्याशी बुद्धिबळावर बोलणं हेच मोठं शिक्षण आहे, असं माझ्या लक्षात आलं. कारण, त्याच्या इतकं प्रभुत्व मिळवलेले लोक आपल्याशी बोलतात तेव्हा ते ग्रहण करणं आपल्या हातात असतं,’ १८व्या वर्षी प्रग्यानंद असं बोलतो तेव्हा त्याच्यातील शांत वृत्ती आणि समंजसपणा तसंच प्रगल्भता आपल्याला समजते.

विश्वचषकानंतर खरंतर प्रज्ञानंदला विश्रांतीची गरज आहे. पण, लगेच सोमवारपासून त्याचा पुढचा सामना सुरू होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.