पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला सकाळी 9 च्या सुमारास युरोपीय देश ग्रीसची राजधानी अथेन्स येथे एक दिवसीय दौऱ्यावर पोहोचले. येथील विमानतळावर परराष्ट्रमंत्री जॉर्ज गेरापाट्रिटिस यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर अथेन्समधील एका हॉटेलबाहेर भारतियांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी भारत माता की जयच्या घोषणाही देण्यात आल्या, तसेच मोदींना हेडड्रेस नावाचा पारंपरिक ग्रीक मुकुटही दिला.
(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators : आता बांगलादेशी घुसखोरांचे संकट नगरपर्यंत)
ग्रीस अनेक दिवसांपासून भारताचे ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करण्यास उत्सुक आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात भारताचे ब्रह्मास्त्र म्हटले जाणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्रा ग्रीसला देण्याबाबत करार केला जाऊ शकतो. ग्रीसला भेट देणारे मोदी हे इंदिरा गांधींनंतरचे दुसरे पंतप्रधान आहेत. इंदिराजींनी 1983 मध्ये ग्रीसला भेट दिली होती. त्यानंतर 40 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान ग्रीसला भेट देत आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार, तंत्रज्ञानापासून संरक्षण सहका-यापर्यंत चर्चा होणार आहे.
पंतप्रधान ग्रीसमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना भेटणार
पंतप्रधान मोदी ग्रीसमधील ‘टॉम्ब ऑफ द अननोन सोल्जर’ला भेट देऊन सैनिकांना श्रद्धांजली वाहणार आहेत. यानंतर पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत केले जाईल. ते ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना साकेलारोपौलो आणि पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांची भेट घेणार आहेत. ते ग्रीसमधील मान्यवरांनाही भेटणार आहेत. ग्रीसच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या बिझनेस लंचला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.यानंतर ते भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करतील. पीएम मोदींसोबत १२ भारतीय उद्योगपतीही अथेन्सला पोहोचले आहेत.
तुर्की-पाक युती तोडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या दौ-याला महत्त्व
एप्रिल 2023 मध्ये तुर्कीने पाकिस्तानला बायरक्तार टीबी2 ड्रोन दिले. या ड्रोनने रशिया-युक्रेन युद्धात आपली क्षमता सिद्ध केली आहे. पाकिस्तानला हे ड्रोन मिळणे हे भारतासाठी मोठा धोका आहे. काश्मीर प्रश्नावर भारताच्या विरोधात जाऊन तुर्कस्तान पाकिस्तानला पाठिंबा देत आहे. एवढेच नाही, तर पाकिस्तान आणि इराण वेगाने संरक्षण भागीदारी वाढवत आहेत. पाक-तुर्की यांची युती तोडण्यासाठी भारतीय हवाई दलाचे प्रमुख व्ही.आर. चौधरी ऑगस्ट मध्येग्रीसला गेले होते.
एजियन समुद्राबाबत ग्रीस आणि तुर्की यांच्यात तणाव कायम आहे. याशिवाय सायप्रस बेटाच्या विभाजनाबाबतही 1974 पासून दोन नाटो देशांमध्ये वाद आहे. त्या क्षेत्राला तुर्कीने उत्तर सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक असे नाव दिले. तुर्कस्तानच्या विरोधात जाऊन भारताने सायप्रसच्या मुद्द्यावर ग्रीसला पाठिंबा दिला आहे.
तुर्कस्तान हा देश होण्यापूर्वीपासून ग्रीक आणि तुर्क यांच्यात वैमनस्यचा मोठा इतिहास होता. या मुद्द्यावर भारताने नेहमीच ग्रीसला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर ग्रीसनेही काश्मीर प्रश्नावर भारताला पाठिंबा दिला आहे. ग्रीस देखील UNSC मध्ये भारताच्या स्थायी स्थानाचा समर्थक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community