- ऋजुता लुकतुके
दोन तरुणांनी सुरू केलेल्या झेप्टो या कंपनीने २०२३ मध्ये आतापर्यंत २०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक आकर्षित करून २०२३ वर्षातील देशातली पहिली युनिकॉर्न कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. मागच्या अकरा महिन्यांत भारतात एकही स्टार्ट अप कंपनी युनिकॉर्न (१ अब्ज अमेरिकन डॉलरचं बाजार मूल्य) झाली नव्हती. पण, ही कसर झेप्टो या कंपनीने अलीकडेच भरून काढली आहे. २०२३ मधली ही पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली आहे. कंपनीचं बाजारमूल्य या क्षणी आहे १.४ अब्ज अमेरिकन डॉलर. यावर्षी कंपनीने ५६० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक आपल्याकडे खेचली.
कैवल्य व्होरा आणि आदीत पलिचा या दोन तरुणांनी सुरू केलेली ही ऑनलाईन डिलिव्हरी करणारी ई-कॉमर्स कंपनी आहे. आणि कंपनीने मिळवलेला युनिकॉर्नचा दर्जा सध्याच्या स्टार्ट अप कंपन्यांना आलेली मरगळ धुवून टाकेल अशी अपेक्षा आहे. कारण, सप्टेंबर २०२२ मध्ये मोलबियो डायग्नोस्टिक्स या कंपनीने युनिकॉर्न दर्जा मिळवल्यानंतर एकाही भारतीय स्टार्टअपला हा दर्जा मिळाला नव्हता. पण, झेप्टोनं युनिकॉर्न दर्जा तर मिळवलाच. आता २०२५ मध्ये शेअर बाजारात नोंदणी करण्याचं उद्दिष्टंही ठेवलं आहे.
(हेही वाचा – राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार Yadu Joshi यांची निवड)
झेप्टोची झेप
जानेवारी २०२१ मध्ये कैवल्य व्होरा आणि आदीत पलिचा यांनी ही कंपनी स्थापन केली होती. पहिल्याच फेरीत कंपनीने ७ लाख ३० हजार अमेरिकन डॉलरची गुंतवणूक मिळवली होती. आणि ऑक्टोबर २०२१ पर्यंत कंपनीचं मूल्यांकन २२५ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकं होतं. पण, झेप्टो स्टार्ट अपची स्पर्धा सुरुवातीपासून स्विगी इन्स्टामार्ट, झूमॅटो, डन्झो आणि बिग बास्केट या ॲप सेवांशी होती. बाकीच्या कंपन्या या क्षेत्रात पाय रोवलेल्या होत्या. आणि बिग बास्केटला टाटा तर डनझोला रिलायन्सने ताब्यात घेतल्यानंतर या कंपन्यांना टाटा आणि रिलायन्स समुहाचा पाठिंबा मिळाला.
याउलट झेप्टोचे दोन्ही संस्थापक कैवल्य आणि आदीत हे फक्त १९ वर्षांचे होते. आणि ऑनलाईन सेवेचं नेटवर्क त्यांनी स्वत: उभारलं होतं. अशावेळी स्पर्धा ओळखून दोघांनी आक्रमक रणनिती आखली. आणि वस्तू १० मिनिटांत घरपोच पोहोचवण्याची त्यांची रणनीती यशस्वी ठरली. आताही याच गोष्टीसाठी झेप्टोची सेवा ओळखली जाते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगरां ऐवजी या दोघांनी दुसऱ्या क्रमांकाची शहरं आणि छोट्या शहरांपर्यंत सेवा पुरवण्याचं धोरण ठेवलं, जे यशस्वी होताना दिसतंय. त्यामुळे स्टार्ट अपना लागणारं आर्थिक पाठबळ या कंपनीने २०२३ मध्ये मिळवलं आहे. या जोरावर कैवल्य व्होरा हा कंपनीचा एक संस्थापक देशातला सर्वात तरुण करोडपती ठरला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community