ऋजुता लुकतुके
त्याच्या बुद्धिबळ विश्वचषकातील कामगिरी तुलना अनेकांनी भारताच्या चंद्रयान मोहिमेशी केली. याला एक कारण नामसाधर्म्यंही होतं. कारण, विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं, त्यातून प्रग्यान नावाचं रोव्हर यान चंद्रावर उतरणार होतं. आणि पुढचे काही महिने ते चंद्राचा अभ्यास करणार होतं.
ही सगळी प्रक्रिया सुरळीत पार पडून प्रग्यान चंद्रावर उतरलंही. त्याचवेळी बुद्धिबळात प्रग्यानंद नावाचा १९ वर्षीय एक तारा विश्वचषक स्पर्धेत अव्वल क्रमांकाच्या मॅग्नस कार्लसनशी सडेतोड लढत होता. नेमका प्रग्यानंदचा अंतिम लढतीत पराभव झाला. आणि त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पण, या वाटचालीतही त्याने बुद्धिबळातील काही विक्रम आपल्या नावावर केले. त्यांची माहिती करून घेऊया.
१. प्रग्यानंदचा विक्रमांच्या दिशेनं प्रवास १०व्या वर्षीच सुरू झाला होता. १० वर्षं, ९ महिन्यांचा असताना २०१६ मध्ये प्रग्यानंदने आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याचा मान मिळवला. तेव्हा प्रग्यानंदने सर्जेई कारजाकिनचा सर्वात तरुण ग्रँडमास्तर होण्याचा विक्रम मोडला होता. पण, प्रग्यानंदचा विक्रमही नंतर मोडला गेलाच. नोव्हेंबर २०१९ मध्ये भारताचा आणखी एक उगवता बुद्धिबळपटू अभिमन्यू मिश्राने आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याचा मान मिळवला. आणि हा मान मिळवताना तो प्रग्यानंदपेक्षा १७ दिवसांनी लहान होता.
२. आंतरराष्ट्रीय मास्टर ते ग्रँडमास्टर हा प्रवास प्रग्यानंदने दोन वर्षांत पूर्ण केला. जून २०१८ मध्ये तो ग्रँडमास्टर झाला तेव्हा त्याचं वय होतं १२ वर्षं आणि १० महिने. रशियाच्या सर्जेई कारजाकिन नंतर तो जगातील सर्वात लहान ग्रँडमास्टर ठरला.
३. बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना अर्थात फिडे जे मानांकन देते ते एलो रेटिंग गुणांवर आधारित असतं. ही एक क्लिष्ट पद्धती आहे. यात २६०० एलो रेटिंग गुण मिळवणारा प्रग्यानंद हा दुसरा तरुण खेळाडू आहे. डिसेंबर २०२० मध्ये १४ वर्षं, ९ महिने आणि २४ दिवसांचा असताना हा टप्पा त्याने पार केला.
४. एप्रिल २०२१ मध्ये प्रग्यानंदची जगाने सगळ्यात आधी दखल घेतली जेव्हा त्याने मानाची पोलगर बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. या विजेतेपदाबरोबरच त्याने मेल्टवॉटर जागतिक टूअरमध्ये थेट प्रवेश मिळवला. आणि जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूंशी दोन हात करताना त्याने दहावा क्रमांकही पटकावला.
हेही वाचा -(Vijay Vadettiwar : मलबार हिलसाठी अडून बसलेले वडेट्टीवारांकडे आता मंत्रालयासमोर राहणार)
५. आपली पहिली बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा प्रग्यानंद खेळला ती २०२१ मध्ये. यावेळी जागतिक क्रमवारीत त्याचं मानांकन ९०वं होतं. पण, दुसऱ्याच फेरीत त्याने ग्रॅब्रिएल सर्गिसियानला २-० असं हरवलं. आणि या स्पर्धेत चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली. आणखी एक ग्रँडमास्टर मायकेल क्रासेनक्रोवलाही त्याने टायब्रेकरवर हरवलं. पण, अखेर चौथ्या फेरीत मॅक्झिम वेशिअर लाग्रावकडून तो पराभूत झाला.
६. २०२३ च्या बुद्धिबळ विश्वचषकात तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. आणि अशी कामगिरी करणारा विश्वनाथन आनंद नंतर तो फक्त दुसरा भारतीय ठरला. अंतिम फेरीतही अग्रमानांकीत मॅग्नस कार्लसनला त्याने तगडी झुंज दिली. पारंपरिक दोन सामने बरोबरीत सोडवल्यावर टायब्रेकरवर त्याचा ०.५ – १.५ असा पराभव झाला. विश्वनाथन आनंदनेच त्याच्या कामगिरीची तुलना पहिल्यांदा भारताच्या चंद्रयान मोहिमेशी केली.
७. अझरबैजानमध्ये बाकू इथं विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली त्यानंतर काही दिवसांनी प्रग्यानंद १० ऑगस्टला १८ वर्षांचा झाला. त्यामुळे मानाच्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेतील तो वयाने सगळ्यात लहान अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेला खेळाडू आहे.
८. एकाच विश्वचषक स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील १,२ आणि ३ क्रमांकावरील खेळाडूंशी दोन हात केलेला आणि यातील दोन सामने जिंकलेला प्रग्यानंद हा पहिला खेळाडू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community