मुंबई विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आल्याची घटना घडली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर मुंबई पोलिसांसह यंत्रणा सतर्क झाल्या.
नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गुरुवारी धमकीचा फोन कॉल आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने विमानतळावरील विमानात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले तसेच विमान 10 तासांनी टेक ऑफ करणार असून मदतीची आवश्यकता असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. या माहितीनंतर नवी मुंबई पोलिसांकडून तात्काळ मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यासोबतच दहशतवाद विरोधी यंत्रणा, स्थानिक सहार पोलीस, बॉम्ब शोधक पथकाला सतर्क करण्यात आले. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण विमानतळाची सुरक्षा यंत्रणांकडून पाहणी करण्यात आली. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली होती. पोलिसांनी दूरध्वनी आलेल्या क्रमांकाला ट्रेस करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. धमकीचा फोन सातारा जिल्ह्यातील एका रहिवाश्याचा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी रहिवाशाची चौकशी केली असता त्यांच्या 10 वर्षांच्या अपंग मुलाने चुकून दूरध्वनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर सर्व यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आली.
दुसरी घटना
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर परिसरात सीरिअल बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याची धमकी फोनवर मुंबई पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 34 वर्षीय आरोपीला लातूर जिल्ह्यातून अटक केली आहे. धमकीच्या फोननंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली होते. त्यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला आणि फोन करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहे.