Virat Kohli : विराट कोहलीला बीसीसीआयने का दिली तंबी?

स्टार फलंदाज विराट कोहलीने गोपनीयता कलमाचा भंग केल्यामुळे बीसीसीआयकडून त्याला तंबी मिळाली आहे. असं विराटने नेमकं काय केलं पाहूया…

129
Virat Kohli : विराट कोहलीला बीसीसीआयने का दिली तंबी?
Virat Kohli : विराट कोहलीला बीसीसीआयने का दिली तंबी?

ऋजुता लुकतुके

स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आशिया कपसाठी जोरदार तयारी करत आहे. आणि ती करत असताना उत्साहाच्या भरात विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यो-यो चाचणीचा निकाल पोस्ट करून टाकला. विश्रांतीनंतर पुन्हा मैदानावर उतरूनही आपण यो-यो ही कठीण तंदुरुस्ती चाचणी पार केली याचा आनंद विराटला झाला होता. पण, त्याचं हे वागणं बीसीसीआय अधिकाऱ्यांना मात्र आवडलं नाही. गोपनीय माहिती सोशल मीडियावर उघड केल्याबद्दल त्यांनी उघडपणे विराट कोहलीचं नाव न घेता तंबी दिली आहे.

विराटची पोस्ट

विराट कोहली भारताच्या सगळ्यात फिट खेळाडूंपैकी एक आहे. आताही यो-यो ही कठीण तंदुरुस्ती चाचणी त्याने १७.२ गुणांसह उत्तीर्ण केली. खरंतर या चाचणीसाठीचा निकष १६.५ आहे. त्यापेक्षा ०.७ गुण जास्त मिळवल्यामुळे विराट खूश होता. त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. आणि खाली एक संदेशही लिहिला, ‘यो-यो चाचणी १७.२ गुणांसह पार केली याचा खूप आनंद आहे.’

हेही वाचा -(‘गदर २’चे संसदेत होणार स्पेशल स्क्रिनिंग)

बीसीसीआयने मात्र तातडीने सर्व खेळाडूंना एक तोंडी संदेश पाठवला. आणि यात सरावादरम्यानच्या गोष्टी आणि असे निकाल गुप्त किंवा गोपनीय ठेवण्याबद्दल खेळाडूंना पुन्हा एकदा बजावलं. ‘खेळाडू प्रशिक्षणादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर टाकू शकतात. पण, त्यांनी तंदुरुस्ती चाचणीतले गुण किंवा अगदी सराव सामन्यातली कामगिरीही जाहीर करू नये, हा करारातील गोपनीयता कलमाचा भंग मानला जाईल, असं खेळाडूंना तोंडी सांगण्यात आलं आहे,’ असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला सांगितलं.

आशिया चषकासाठी निवड झालेले भारतीय खेळाडू सध्या बंगळुरूमध्ये नॅशनल क्रिकेट अकॅडमीत सराव करत आहेत. आयर्लंडमधून नुकतेच परतलेले खेळाडू मात्र या शिबिरात अजून दाखल झालेले नाहीत. ते २५ ऑगस्टला बंगळुरूमध्ये येतील. ३० ऑगस्टला भारताची आशिया चषकातील मोहीम सुरू होईल. आणि पुढे एकदिवसीय विश्वचषकही संघाला खेळायचा आहे. तो लक्षात घेऊन बीसीसीआयने खेळाडूंसाठी तंदुरुस्तीचा खास कार्यक्रम आखला आहे. खेळाडूंचा व्यायाम आणि आहार यासाठी तज्जांनी विशेष कार्यक्रम बनवला आहे. आणि प्रत्येक खेळाडूसाठी हा कार्यक्रम वेगवेगळा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.