Asian Games 2023 : ६३४ जणांचा भारतीय संघ जाहीर, बजरंग पुनियाचा समावेश

महिला आणि पुरुषांचा क्रिकेट संघही स्पर्धेत सहभागी होणार

165
Asian Games 2023 : ६३४ जणांचा भारतीय संघ जाहीर, बजरंग पुनियाचा समावेश

ऋजुता लुकतुके

सप्टेंबर २३ ते ८ ऑक्टोबर दरम्यान चीनच्या होआंगझाओ शहरात होणाऱ्या आशियाई स्पर्धांसाठी (Asian Games 2023) ६३४ जणांचा भारतीय संघ सिद्ध झाला आहे. या सर्व नावांना क्रीडा मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. या संघात कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात आंदोलन करणारा कुस्तीपटू बजरंग पुनियाही आहे. शिवाय महिला आणि पुरुषांचा प्रत्येकी १५ जणांचा क्रिकेट संघही आहे.

२०१८ मध्ये जकार्ता इथं झालेल्या स्पर्धेत ५७२ जणांचा भारतीय संघ (Asian Games 2023) सहभागी झाला होता. हा जुना विक्रमही आता मोडीत निघाला आहे. म्हणजे, आताच्या आशियाई स्पर्धेत खेळणारा संघ हा भारताचा सर्वात मोठा संघ आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने तर ८५० जणांच्या नावाचा प्रस्ताव क्रीडा मंत्रालयाकडे पाठवला होता.

सर्वाधिक ६५ खेळाडू ॲथलेटिक्स (Asian Games 2023) प्रकारात सहभागी होणार आहेत. यात ३४ पुरुष तर ३१ महिला खेळाडू आहेत. सांघिक प्रकारात क्रिकेट आणि फुटबॉलचे महिला तसेच पुरुषांचे संघ स्पर्धेत खेळणार आहेत. तर हॉकी प्रकारातही महिला आणि पुरुषांचा संघ मिळून ३६ खेळाडूंची निवड झाली आहे.

नेमबाजी (Asian Games 2023) प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. यंदाही ३० जणांचा संघ स्पर्धेत सहभागी होणार आहे. आणि त्यांच्याकडून पदकाचीच अपेक्षा आहे. तर सेलिंग प्रकारात ३३ जणांचा संघ सहभागी होणार आहे.

भारोत्तोलन, जिमनॅस्टिक्स, हँडबॉल आणि रग्बी या क्रीडाप्रकारात एकाही पुरुष खेळाडूच्या नावाला क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता मिळू शकली नाही.

(हेही वाचा – Sharad Pawar : आमदार म्हणजे पक्ष नव्हे; राष्ट्रवादीत फूट नाहीच – शरद पवार)

बजरंग आशियाई स्पर्धांमध्ये खेळणार?

आशियाई स्पर्धांसाठी (Asian Games 2023) कुस्ती प्रकारात ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनिया या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे बजरंग खेळाडूंच्या निवड चाचणीत सहभागी झाला नव्हता. पण, कुस्ती महासंघाने नेमलेल्या तात्पुरत्या समितीने बजरंगच्या थेट प्रवेशाची शिफारस केली होती. ती क्रीडा मंत्रालय आणि ऑलिम्पिक असोसिएशनने मान्य केली आहे. पण, त्यामुळे निवड चाचणी स्पर्धेत पहिला आलेल्या विशाल कालीरमणने आपलाही समावेश संघात व्हावा यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनला साकडं घातलं आहे.

दुसरीकडे थेट प्रवेश मिळूनही बजरंग आशियाई स्पर्धेत (Asian Games 2023) खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्हच आहे. कारण, अलीकडेच त्याने कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या खाप पंचायतींचा निर्णय आपल्याला मान्य असेल, असं भाष्य केलं होतं.

१० सप्टेंबरला महाखापपंचायत होणार आहे. या परिषदेत ही पंचायत बजरंगच्या आशियाई खेळातील सहभागावर निर्णय देऊ शकते. कुस्तीपटूंनी माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन केलं, त्या आंदोलनाला हरयाणातील खाप पंचायतीच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. हरयाणामध्ये या पंचायतींचं प्रस्थ मोठं आहे. आणि त्यांचा निकाल लोक डावलत नाहीत. बजरंगनेही खाप पंचायतीने न खेळण्याचा आदेश दिल्यास आशियाई स्पर्धेतील सहभागावर पुनर्विचार करणार असल्याचं म्हटलं होतं.

बुद्धिबळ या आणखी एका खेळात भारतीय संघ तगडं आव्हान उभं करू शकतो. कोनेरू हम्पी बरोबरच डी हरिका आणि प्रग्यानंद यांचा संघात समावेश आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.