गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवात केवळ ३ दिवसच रात्री १२ वाजेपर्यंत ध्वानिक्षेपक लावण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मात्र या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, दरवर्षी गणेशोत्सवात किमान चार दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी देण्यात आली होती. पाचव्या दिवशी गौरी-गणपतींचे विसर्जन होते. यंदा हा एक दिवसही कमी करण्यात आला आहे. मात्र पुण्यात ध्वनिक्षेपक लावण्यास पाच दिवसांची परवानगी दिल्यामुळे मुंबईवर मात्र अन्याय करण्यात आला असून, असा दुजाभाव न करता ध्वनिक्षेपक लावण्यास एक दिवस वाढवून द्यावा अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समिती कडून करण्यात आली.
ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार बंद जागांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणांसाठी काही ठराविक दिवसांकरिता सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक लावण्यात येतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यासाठी दिवस ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील १५ पैकी ११ दिवसांची यादी फेब्रुवारी महिन्यात जाहीर केली होती.
(हेही वाचा – Water Shortage : पुण्यासह ‘या’ १० जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई)
गणेशोत्सवात दुसरा दिवस, पाचवा दिवस आणि अनंत चतुर्दशी हे तीन दिवस विसर्जनाचे दिवस असतात. हे तीनही दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावर्षी गौरी-गणपतींचे पाच दिवसांनी विसर्जन होत असल्यामुळे सातव्या दिवशी दिली जाणारी परवानगी रद्द करण्यात आल्यामुळे गणेशोत्सव समन्वय समितीने नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात पाच दिवसांची परवानगी देण्यात आली आहे मग मुंबईला दुसरा न्याय का? असा सवाल अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी उपस्थित केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community