- ऋजुता लुकतुके
पार्ट टाईम नोकरी देतो असं सांगून २८ वर्षीय मुंबईकर तरुणाकडून साडेनऊ लाख रुपये लुटले. एका व्हाॅट्सअॅप संदेशने केला घात. मुंबईत राहणारा २८ वर्षीय जोएल चेट्टी फुटबॉल प्रशिक्षक आहे. १६ ऑगस्टला त्याच्या व्हाॅट्सअॅपवर एक संदेश आला. एका महिलेनं तिच्या स्वत:च्या कंपनीत जोएलला पार्ट-टाईम नोकरी देऊ केली होती. जोएलला ही नोकरीची संधी वाटली. आणि त्याने संदेशांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. पण, पुढे जे घडलं त्यामुळे कामाचे अतिरिक्त पैसे सोडाच, त्याने मेहनतीने कमावलेले ९,७८,००० रुपये मात्र गेले.
जोएलने पार्ट-टाईम नोकरी स्वीकारल्यानंतर त्याला एका युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला सांगण्यात आलं. आणि या चॅनलचे काही स्क्रीनशॉट त्याला घ्यायचे होते. मग जोएलच्या सहमतीने नोकरी देणाऱ्या महिलेनं त्याचा बँकेचा खाते क्रमांक आणि इतर वैयक्तिक माहिती मागून घेतली. आणि शेवटी एक टेलिग्राम लिंक पाठवली. हे सगळं जोएलच्या सहमतीनेच होत होतं. जोएलला पहिलं काम पूर्ण केल्याचे दीडशे रुपयेही मिळाले. मग त्याने थोडी मोठी कामं केली. आणि त्याचा त्याला आधी ठरलेल्या २००० रुपयांपेक्षा थोडा जास्त म्हणजे २,८०० इतका मोबदला मिळाला. पण, यानंतर त्या महिलेनं जोएलकडेच एक प्रकारचं खातं उघडण्यासाठी ९,००० रुपये मागितले. आणि एका कामगिरीसाठी सुरुवातीचा खर्च म्हणून ४०,००० रुपये मागितले.
(हेही वाचा – Ganeshotsav 2023 : मुंबईत केवळ तीन दिवस तर पुण्यात पाच दिवस १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी)
आणि इथून पुढे सुरू झाला वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागण्याचा सिलसिला. १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान जोएलकडून त्या महिलेनं ९,८७,६२० रुपये मागून घेतले. इतके पैसे भरून झाल्यानंतर जोएल चेट्टी यांना शंका आली. त्यांनी बहिणीशी संवाद साधला आणि त्यांना खात्री पटली की काहीतरी संशयास्पद आहे. आणि त्यांनी मुंबई पोलिसांकडे संपर्क साधला तेव्हा आपण फसल्याचं आणि आपल्यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्याचं त्यांना लक्षात आलं. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
मुंबई सायबर गुन्हे शाखेनं आता जोएल यांची तक्रार नोंदवून घेतली आहे. अशा घटना फक्त मुंबईतच नाही तर बंगळुरूमध्येही याच सुमारास नोंदवण्यात आल्या आहेत. दोन महिलांची मिळून साडे सहा लाखांची फसवणूक झाली आहे. फ्री प्रेस जर्नलने या विषयीची बातमी दिली आहे. आणि मुंबई सायबर पोलिसांनी आपली वैयक्तिक माहिती तसंच बँकेचा खाता क्रमांक अनोळखी व्यक्तीला देऊ नका, तसंच अनोळखी व्यक्तीशी अशा प्रकारचे व्यवहार करू नका असं आवाहन केलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community