Chandrayaan 3 यशस्वीरित्या पोहोचले, आता पुढे काय?

146
  • शैलेश संसारे

१४ जुलै २०२३ रोजी भारतातून उड्डाण केलेल्या चंद्रयान-३ ने २३ ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद अवतरण केले आणि नवा इतिहास घडवला. या यशामागे इस्त्रोमधील नेतृत्व आणि संशोधकांच्या अनेक पिढ्यांचे योगदान आहे. भारताच्या या दिग्विजयानंतर पुढे काय, असा सवाल अनेकांना पडला आहे. त्याचे उत्तर नेमक्या शब्दांत.

सध्याच्या अनुमानानुसार, चंद्रयान-३ चे लँडर ‘विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ एका चंद्र दिवसापुरते मर्यादित राहील, जे पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचे आहे. या कालावधीनंतर, सूर्य चंद्रावर मावळेल आणि १४ दिवस रात्र असेल. रात्री चंद्रावर तापमान साधारण -१३०°c म्हणजेच कमालीचे थंड असेल. या तापमानात रोवरची बॅटरी तग धरणे आवश्यक आहे. तिथले दिवसाचे तापमान १२०°c इतके उष्ण असते. अशा तापमान फरकामध्ये यानाने तग धरून राहणे, ही भारतीय अंतराळ संशोधकांची परीक्षाच आहे. या कठोर परीक्षेत ते पास झाले, तर तो फार मोठा विजय असेल. लँडर चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर नियोजित केलेल्या प्रमुख वैज्ञानिक प्रयोगांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे. भूकंपामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर झालेल्या कंपनांचा अभ्यास करणे, उल्का आघातामुळे, तसेच रोव्हर हालचालीमुळे होणाऱ्या कंपनांचा अभ्यास करणे, पृष्ठभागाच्या जवळच्या प्लाझ्मा वातावरणाचा अभ्यास करणे, तापमान आणि पृष्ठभागाखाली १० सेंमी खोलीपर्यंत मोजमाप करणे, लँडिंग साइटच्या सभोवतालच्या मूलभूत रचनेचा अभ्यास करणे, चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचे वर्णक्रमीय अवलोकन करणे, आदी बाबींचा अभ्यास या मोहिमेत केला जाणार आहे.

(हेही वाचा Chandrayaan – 3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोचे प्रमुख म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्माचा शोध घेणे माझ्या जीवनाचा भाग)

सहा चाकी प्रज्ञान रोव्हर आपल्या नेव्हिगेशन कॅमेऱ्यांचा वापर करून लँडिंग क्षेत्राचे सर्वेक्षण करेल. त्याचे फोटो आणि इतर संशोधित माहिती विक्रम लँडरला पाठवेल. त्यानंतर विक्रम लँडर त्याच्यावरील ट्रान्समिटिंग अँटिनाद्वारे पृथ्वीवर परत पाठवेल, तसेच इस्त्रो रोव्हरला त्यांच्या कमांड सेंटरवरून सूचना पाठवेल. विक्रम लँडरपासून रोव्हर जास्तीत जास्त ५०० मीटर (१,६४० फूट) पर्यंत जाऊ शकते.

१४ दिवसांची कालमर्यादा पूर्ण झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हरचे काय होईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चंद्रावरील वातावरणीय बदल झेलल्यानंतरही जर या रोव्हरची बॅटरी चालू स्थितीत राहिली, तर त्याच्यावरील सोलर पॅनलने ती पुन्हा चार्ज होईल. त्यानंतर रोव्हर पुन्हा कार्यरत होईल आणि पुढील भूभागाचे सर्वेक्षण करेल.

चंद्र मोहिमेच्या अर्थव्यवस्थेत प्रवेश

चंद्राच्या दक्षिण धृवावर सॉफ्ट लँडिंग करून भारताने एकप्रकारे चंद्र मोहिमेच्या अर्थव्यवस्थेत प्रवेश केला आहे. हे क्षेत्र अब्जावधी डॉलर्सचे आहे, नवीन व्यवसाय संधी, तांत्रिक प्रगती आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील मौल्यवान संसाधनांच्या शोधासाठी दरवाजे आपण उघडले आहेत, असे म्हणायला हरकत नाही. इस्रोने ज्याप्रकारे दुसऱ्या देशातील खासगी कंपन्यांचे उपग्रह सोडून परकीय चलनाची कमाई केली, त्यापद्धतीने अशा चंद्र मोहिमांमधून दुसऱ्या देशांना त्यांचे रोव्हर, उपकरणे चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवून भविष्यात त्याद्वारे नफा कमावता येईल. त्यामुळे चंद्रयान-३ हे ‘चंद्र अर्थव्यवस्थेत’ भारताचे पहिले पाऊल आहे.

(लेखक खगोल अभ्यासक आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.