Chandrayaan 3 : चंद्र आहे साक्षीला!

231
  • दा. कृ. सोमण

२३ ॲागस्ट रोजी भारताचे चंद्रयान -३ हे अगदी ठरल्यावेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवप्रदेशात व्यवस्थित उतरले त्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ या संस्थेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. या मोहिमेतील यशामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवप्रदेशात यान उतरविणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तसेच चंद्रभूमीवर यान उतरविणारा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन यांनी आपली याने चंद्रभूमीवर उतरवली आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवप्रदेशात यान उतरविणे हे तसे कठीण काम होते. तेथील भाग हा कमी सूर्यप्रकाशाचा आहे. तापमान फार कमी आहे. त्या भागात अनेक विवरे आहेत वगैरे प्रतिकूल गोष्टी अनेक होत्या. त्या सर्वांवर मात करीत भारतीय शास्त्रज्ञांनी हे यश कमीत कमी खर्चात मिळविले आहे म्हणूनच भारतीय शास्त्रज्ञांचे विशेष कौतुक होत आहे.

४ ॲाक्टोबर १९५७ रोजी रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह ‘स्पुटनिक’ हा यशस्वीरित्या अंतराळात पाठवला. तेथपासून अंतराळ युगाला सुरुवात झाली. डॉ. विक्रम साराभाई, डॉ. होमी भाभा यांनी जाणले की भारताच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या भविष्यकालीन संरक्षणासाठी अंतराळ संशोधनाखेरीज पर्याय नाही. १५ ॲागस्ट १९६९ रोजी इस्रोची स्थापना झाली. ‘मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान’ हे इस्रोचे ब्रीदवाक्य ठरले.

नेत्रदीपक कामगिरी

१२ एप्रिल १९७५ रोजी भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह ‘आर्यभट्ट’ सोविएत युनियनच्या मदतीने यशस्वीपणे अंतराळात पाठविण्यात आला. ३ एप्रिल १९८४ रोजी सोविएत युनियनच्या अवकाशवीरांसह भारताच्या राकेश शर्मा यांनी प्रथमच अवकाशात यशस्वी भ्रमण केले. भारताने रॉकेटस् तंत्रज्ञानात प्रगती केली. क्रायोजेनिक इंजिन भारताला देण्याचे प्रगत देशांनी नाकारले, भारतीय शास्त्रज्ञांनी क्रायोजेनिक इंजिनही तयार केली. प्रगतीचा वेग अखंडपणे चालूच राहिला. चंद्रयान-१ चे प्रक्षेपण सतीश धवन केंद्रातून २२ ऑक्टोबर २००८ रोजी झाले. या मोहिमेमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवप्रदेशात गोठलेल्या स्वरूपात पाणी आहे यांचे पुरावे जगाला दिले. मंगळयान-१ चे यश तर खूप मोठे होते. मंगळयान-१चे प्रक्षेपण ५ नोव्हेंबर २०१३ रोजी सतीश धवन केंद्रावरून झाले.

(हेही वाचा Chandrayaan – 3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोचे प्रमुख म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्माचा शोध घेणे माझ्या जीवनाचा भाग)

एकाच रॉकेटद्वारे १०४ उपग्रह अंतराळात पाठविण्याचा जागतिक विक्रम १५ फेब्रवारी २०१७ रोजी इस्रोने केला. त्यापूर्वी २०१४ मध्ये ३७ उपग्रह अंतराळात पाठविण्याचा रशियाचा विक्रम होता, तो मोडीत निघाला. २२ जुलै २०१९ रोजी सतीश धवन केंद्रावरून चंद्रयान-२ ने यशस्वी उड्डाण केले. ते चंद्रकक्षेत पोहोचले परंतु त्यावरील विक्रम लॅन्डरचे चंद्रभूमीवर सॅाफ्ट लँडिंग होऊ शकले नाही. चंद्रयान-३ मधील विक्रम लँडरचे चंद्रभूमीवर सॅाफ्ट लँडिंग झाले. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रयान-२ पेक्षा कमी खर्चात चंद्रयान-३ ची मोहीम यशस्वी झाली आहे.

विक्रम लँडरवर RAMBHA, ChaSTE, ILSA, LRA ही चार यंत्रे आहेत. चंद्राचे वातावरण, प्लाझ्मा, औष्णिक गुणधर्म, चंद्रकंप, चंद्रपृथ्वी अचूक अंतर इत्यादी संशोधन ही यंत्रे करणार आहेत. प्रज्ञान रोव्हर हा चंद्रभूमीवर फिरणार आहे. त्याच्यावर LIBS आणि APXS ही दोन यंत्रे आहेत. चंद्रमातील मूलद्रव्यांचा, क्षारांचा आणि गुणधर्मांचे संशोधन केले जाणार आहे. चंद्रावर दक्षिण ध्रुवप्रदेशात पाणी किती व कोणत्या रूपात आहे? हिलियम-३ किती आहे? इत्यादी प्रश्नांची उत्तरेही मिळणार आहेत. चंद्राभोवती भ्रमण करणाऱ्या प्रॅापुल्शनवर SHAPE हे यंत्र बसविण्यात आले आहे. प्रज्ञान रोवरमार्फत इस्रोचे बोधचिन्ह आणि भारताची राजमुद्रा, तिरंगा चंद्रभूमीवर कायमचा राहणार आहे.

इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-१ ही मोहिम हाती घेतली आहे. गगनयान मधून भारतीय अंतराळवीर यशस्वी अंतराळ सफर करून येणार आहे. शुक्रग्रहाचा अभ्यास करण्यासाठीही एक यान शुक्रग्रहाकडे पाठविण्यात येणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष आता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी वेधून घेतले आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील कामगिरीला आता चंद्रयान-३ च्या या यशामुळे चंद्र साक्षीला राहणार आहे.

(लेखक खगोल अभ्यासक आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.