Spinal Disorders : पालिकेच्या ‘या’ रुग्णालयात मणक्याच्या विकारांवर मोफत शस्त्रक्रिया

मणक्याच्या शस्त्रक्रियांची बाजारात वाढली मागणी.

187
Spinal Disorders : पालिकेच्या 'या' रुग्णालयात मणक्याच्या विकारांवर मोफत शस्त्रक्रिया
Spinal Disorders : पालिकेच्या 'या' रुग्णालयात मणक्याच्या विकारांवर मोफत शस्त्रक्रिया
मुंबईतील रस्त्यावरील वाढते खड्डे, दैनंदिन वाहतूक प्रवास, बैठी जीवनशैली आदी समस्यांमुळे मणक्याच्या विकारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. तरुणांनाही मणक्याच्या विकारामुळे महागड्या शस्त्रक्रिया कराव्या लागत असल्याने मणक्याच्या शस्त्रक्रियांची मागणी बाजारात वाढली आहे. मणक्याचे वाढते आजार पाहता मुंबई महानगरपालिकेच्या सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात मणक्याच्या विकारांवर आवश्यक शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध झाल्या आहेत. रुग्णालयातील स्पाईन फाउंडेशनच्यावतीने मणक्यासंबंधी सर्व उपचार रुग्णांना मोफत दिले जातात.
व्ही. एन. देसाई रुग्णालयात हजाराहून अधिक मणक्याच्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून दिली गेली. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर प्रत्येक रुग्णाला फिजिओथेरपीचीही सेवा दिली जाते. स्पाईन फाउंडेशनमधील तज्ञ रुग्णांना फिजिओथेरपीही देतात. फिजिओथेरपिस्ट डॉक्टर गौरीश केंकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना मणक्याचे आणि पाठीचे व्यायाम शिकवले जातात.
रुग्णांना व्यायामाची प्रात्यक्षिके तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावी लागतात. मणक्याच्या विकारांवरील शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात अत्यंत महागड्या असल्याने रुग्णांना शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या पुनर्वसन उपचाराचा खर्च परवडेनासा होतो. यासह पालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार उपलब्ध आहेत. नामांकित स्पाईन सर्जन यांनी एकत्रित मिळून स्पाईन फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे.
या शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध – 
सर्वाइकल स्पाइन शस्त्रक्रिया, ट्रॉमा शस्त्रक्रिया, कर्करोगाच्या गाठीची शस्त्रक्रिया, मणक्यातील संसर्गाचे शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध आहेत. खाजगी रुग्णालयात स्कॉलायसिस शस्त्रक्रिया आठ ते नऊ लाखांपर्यंत उपलब्ध असते. ही सर्वात महागडी मणक्यासंबंधी शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेचा खर्चही सरकारी योजनेच्या माध्यमातून रुग्णालयात उपलब्ध करण्यात आला आहे. एखादा रुग्ण कोणत्याही योजनेत बसत नसेल तर संबंधित रुग्णाचा वैद्यकीय खर्च फाउंडेशनच्यावतीने उचलला जातो.
फ्रोजन शोल्डरकडे दुर्लक्ष नको – 
चुकीच्या जीवनशैलीमुळे ऐन तिशीमध्ये तरुणांना खांद्याचा त्रास जास्त बळकावत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ञांनी नोंदवले आहे. हा आजार वेळीच नियंत्रणात न आल्यास रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्यामुळे फ्रोजन शोल्डरवर वेळीच उपचार सुरू करा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.