मुंबईची जीवनवाहिनी समजाला जाणारा रेल्वे प्रवास ! हा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या आता वाढत आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते जून या कालावधीतील प्रवासी संख्येच्या आढाव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, एप्रिलमध्ये सामान्य श्रेणीतून दररोज सरासरी 84 हजार ज्येष्ठ प्रवासी प्रवास करत होते, तर जूनमध्ये या आकड्यांत लाखापेक्षाही वाढ झाली आहे तसेच या प्रवासाबाबत महत्त्वाची बाब म्हणजे ज्येष्ठांनी यूटीएस अॅपला पसंती दर्शवली आहे.
एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या पासधारक महिला, प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिक यांचे सर्वेक्षण करण्यात आले. मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक अशा सर्व पासधारकांचा यात समावेश आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. एप्रिलमध्ये रोज सरसरी एकूण ९७ हजार ११७ ज्येष्ठ प्रवासी प्रवास करत होते. यात प्रथम श्रेणीच्या प्रवाशांची संख्या १२ हजार ८४६ इतकी आहे. जूनमध्ये पासधारक ज्येष्ठ प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसले. या महिन्यात सामान्य श्रेणीतून रोज सरासरी एक लाख आठ हजार ४३८ आणि प्रथम श्रेणीतून १५ हजार १७६ अशा एकूण एक लाख २३ हजार ६१४ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
(हेही वाचा – Shravan Special : भगवान शंकराने घेतले ‘हे’ दिव्य अवतार, वाचा अलौकिक महत्त्व)
ज्येष्ठांची यूटीएस अॅपला पसंती
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ज्येष्ठांनी युटिएस अॅपला पसंती दर्शवली आहे. रेल्वे प्रवाशांना तिकीट खिडकीच्या रांगेत उभे राहायला लागू नये. यासाठी केंद्रीय रेल्वे सूचना प्रणाली (क्रिस) यूटीएस अॅप विकसित केला आहे. महिला-पुरुषांसह ज्येष्ठ नागरिकांनीही यूटीएस अॅपला पसंती दिली आहे. एप्रिल ते जूनदरम्यान २ लाख ७६ हजार ३९० ज्येष्ठांनी पास काढले आहे. याचा अर्थ रोज सरासरी ३ हजार ७१ ज्येष्ठांनी तिकीट खिडकीऐवजी यूटीएस अॅपने पास काढण्यास पसंती दिली आहे.
मालडबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन
मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेवर उत्तर देताना लोकलमधील मालडबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन असल्याचे प्रतिज्ञापत्र मध्य-पश्चिम रेल्वेने सादर केले आहे. मालडब्यातील आसन रचनेत बदल करून वाढीव आसने देण्याची तयारी रेल्वेने पूर्ण केली आहे. मालडबे ज्येष्ठांसाठी राखीव करण्याच्या प्रस्तावावर रेल्वे मंडळाकडून उत्तर आलेले नाही. यामुळे रेल्वे मंडळाच्या मंजुरीसाठी महामुंबईतील ज्येष्ठांचा सुखद प्रवास अजूनही थांबला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community