केंद्रात हॅट्ट्रिक साधण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून, महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यातील ४८ पैकी किमान ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीने निश्चित केले आहे. ते साध्य करण्यासाठी काही ठिकाणी उमेदवार बदलले जाणार असून, मुंबईतील काही जागांचाही त्यात समावेश आहे.
मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. २०१९ च्या निवडणुकीत हे सर्व मतदारसंघ शिवसेना-भाजपा युतीला मिळाले होते. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर येथील राजकीय गणिते बदलली आहेत. प्राप्त परिस्थितीत सहापैकी ५ मतदारसंघ नव्या युतीकडे असले, तरी महाविकास आघाडीतील तीन पक्षांना एकत्रित सामोरे जावे लागणार असल्याने त्यांचा कस लागणार आहे. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून काही ठिकाणी उमेदवार बदलण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचे कळते. विशेषतः शिवसेनेकडील काही मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
मुंबई दक्षिण आणि उत्तर पश्चिम या शिवसेनेकडील दोन मतदारसंघांची मागणी भाजपाने केली आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर खासदार आहेत. प्रकृतीस्वास्थ्य आणि वयोमान लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देऊ नये, असा भाजपाचा सूर आहे. दुसरे म्हणजे ठाकरे गटाकडून कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल यांनाच मैदानात उतरवण्याची तयारी सुरू झाल्याने सहानुभूतीची लाट चित्र बदलवू शकते, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे कीर्तिकर यांच्या जागेवर जयप्रकाश ठाकूर यांना मैदानात उतरवण्याची चाचपणी भाजपाकडून केली जात आहे. गोरेगावच्या विद्यमान आमदार विद्या ठाकूर यांचे ते पती आहेत. ठाकूर हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असून उत्तर भारतीय, गुजराती आणि मारवाडी मतदारांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांना संधी दिल्यास बदललेल्या समीकरणातही ते निवडून येतील, असा विश्वास भाजपाला आहे. त्यामुळे कीर्तिकर यांना राज्यसभेची खासदारकी देऊन त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले जातील, अशी माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. त्यांना यावेळी काँग्रेसची साथ मिळणार असल्यामुळे अटीतटीची लढत होणार आहे. सावंत यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडे उमेदवार नाही. भाजपाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारणा केली, मात्र ते लोकसभा लढवण्यास इच्छुक नाहीत. राज पुरोहित निवडून येणार नाहीत, अशी स्थिती असल्यामुळे उमेदवार आयात करण्यावर एकमत झाले आहे. भाजपाने काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांना आधीच गळ घालून ठेवला आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा पक्षप्रवेश होईल, असे कळते.
मुंबईतील संभाव्य लढती अशा
१) मुंबई उत्तर : गोपाळ शेट्टी (भाजपा) विरुद्ध संजय निरुपम (काँग्रेस)
२) मुंबई उत्तर पश्चिम : जयप्रकाश ठाकूर (भाजपा) विरुद्ध अमोल कीर्तिकर (ठाकरे गट)
३) मुंबई उत्तर पूर्व : मनोज कोटक (भाजपा) विरुद्ध संजय दीना पाटील (ठाकरे गट)
४) मुंबई उत्तर मध्य : पूनम महाजन (भाजपा) विरुद्ध प्रिया दत्त (काँग्रेस)
५) मुंबई दक्षिण : अरविंद सावंत (ठाकरे गट) विरुद्ध मिलिंद देवरा (भाजपा संभाव्य)
६) मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध महाविकास आघाडी (अद्याप उमेदवार निश्चित नाही)