मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. हा मराठी अस्मितेचा प्रश्न असून याबाबतीत केंद्राने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.
अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या २६ व्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे होते. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री आणि दादरा व नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित राज्याचे प्रशासक, मुख्य सचिव मनोज सौनिक देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी आहे. तिलारी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गोवा राज्यासोबत समन्वयाने काम करीत असून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
नाफेडने कांदा खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले तसेच ही खरेदी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी अशी विनंतीही केली.
(हेही वाचा – Crawford Market मधील अतिक्रमण आणि स्वच्छतेवर बाजार विभागाचे दुर्लक्ष)
किनारी मार्गासाठी मागणी –
राज्य शासन डहाणू ते सिंधुदुर्गपर्यंत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोस्टल रोड (किनारी मार्ग) तयार करीत आहे. गोवा आणि गुजरात या राज्यांशी जर हा मार्ग जोडला गेला तर निश्चितच या राज्यात पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढेल त्याचप्रमाणे सागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टीनेही फायदा होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community