महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण, पुणे, नागपूर, अमरावती या विभागीय मंडळांच्या विविध वसाहतींमधील भाडेकरू तथा रहिवासी यांना सेवाशुल्क ऑनलाईन भरता यावे, याकरिता निर्मित ई-बिलिंग संगणकीय प्रणाली सेवेचा शुभारंभ ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी संजीव जयस्वाल म्हणाले की, म्हाडा सदनिकांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत प्रणालीमध्ये सुधारणा करून म्हाडाने पारदर्शक व सुलभ प्रशासनाचा आदर्श घालून दिला आहे. विभागीय मंडळांमध्ये आता सेवाशुल्क भरण्याकरिता ई-बिलिंग संगणकीय प्रणाली कार्यरत करून लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण म्हाडाने सादर केले आहे. या सेवेमुळे लाखो नागरिकांना घरबसल्या सेवाशुल्क अदा करता येणार आहे. या प्रणालीमुळे म्हाडा व नागरिकांमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला.
ई-बिलिंग प्रणालीमुळे या ४ मंडळांमधील गाळेधारकांना सेवाशुल्क भरण्याकरता ऑनलाईन पेमेंटचा पर्याय उपलब्ध झाला आहे. लवकरच गाळेधारकांना सेवाशुल्काचे देयक त्यांच्या ई-मेल वर प्राप्त होणार आहे व देयकाबाबत एसएमएसवर संदेश देखील प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर गाळेधारकांच्या सेवाशुल्क देयकाविषयी कोणत्याही तक्रारींकरिता ई-बिलिंगच्या संकेतस्थळावर मिळकत व्यवस्थापन निहाय मेलबॉक्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.
ई-बिलिंग प्रणालीचा वापर करण्याकरीता गाळेधारकांना https://mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सिटीझन कॉर्नर या विंडोअंतर्गत ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हाडा मुंबई व औरंगाबाद मंडळाच्या अखत्यारीतील गाळेधारकांसाठी यापूर्वीच ई-बिलिंग प्रणाली सुरू करण्यात आली असून त्याला गाळेधारकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ई-बिलिंग संगणकीय प्रणालीबाबत गाळेधारकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारी ऑनलाईन घरबसल्या नोंदविण्याची सुविधाही या प्रणालीत देण्यात आली आहे. म्हाडाकडे या प्रणालीद्वारे प्राप्त अडचणी, तक्रारींचे विहित कालावधीत निराकरण केले जाणार आहे.
(हेही वाचा – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या; CM Eknath Shinde यांची अमित शहांकडे मागणी)
नवीन ई-बिलींग प्रणाली बाबत..
म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सिटीझन कॉर्नर या विंडोअंतर्गत ही सेवा उपलब्ध आहे. संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर म्हाडाचे बोधचिन्ह असलेले पान उघडेल. ही सेवा वापरण्यासाठी मंडळाकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर प्रत्येकासाठी एक युनिक कन्झ्युमर क्रमांक (Unique Consumer Number) तयार करण्यात आला आहे.
हा युनिक कन्झ्युमर क्रमांक वापरुन संकेतस्थळावर लॉग इन करावे. कन्झ्युमर क्रमांक टाकल्यानंतर पेमेंट करण्यासाठीचे पृष्ठ उघडेल. या पृष्ठाच्या उजव्या बाजूला वर तुमचे देयक डाऊनलोड करण्यासाठीची लिंक दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करताच देयक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड होईल. त्यावर तुमच्या देयकाची संपूर्ण माहिती दिलेली असेल. त्यामध्ये मागील देयक, थकबाकी यांसारख्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील. देयक अदा करणाऱ्याचे नाव, देयकाची रक्कम, मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी टाकला की ‘पे’ या बटनावर क्लिक करावे. त्यावर क्लिक करताच पेमेंट गेटवे ओपन होईल.
या सुविधेअंतर्गत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकींग, युपीआय तसेच अगदी गुगल पे वापरुन सुद्धा गाळेधारकांना देयक अदा करता येणार आहे. गाळेधारकांना हव्या त्या पध्दतीने हे पेमेंट करण्याची मुभा आहे. देयकाची रक्कम खात्यातून वळती झाल्यानंतर गाळे धारकांना लगेचच त्याची पोच मिळेल. प्रत्येक गाळेधारकाला आपल्या खात्याची संपूर्ण माहिती येथे कायम उपलब्ध राहणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community