जंगलातील फळे खाणाऱ्या माकडांना मानवीवस्तीजवळ सहज उपलब्ध होणारे अन्नपदार्थ खाण्याचा ओढा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. शिजलेले अन्नपदार्थ, फास्टफूड यामुळे माकडांना कर्करोगाची बाधा होत असल्याचे वैद्यकीय तपासणीतून उघडकीस आले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार माकडामध्ये कर्करोगाचे निदान 0.3 टक्क्यांपर्यंत आढळून आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे सिल्लोड तालुक्यातील तोंडापूर येथे कर्करोग झालेल्या वानराची घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली आहे. वन्यजीव संवर्धनात सिल्लोड येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. संतोष पाटील जखमी व आजारी वन्य जीवांवर मोफत उपचार करत आहेत. मे महिन्यात तालुक्यातील तोंडापूर परिसरातील जखमी वानर डॉ. पाटील यांच्याकडे उपचारासाठी गावकऱ्यांनी आणले. वानरावर उपचारादरम्यान त्याला गुदद्वाराचा एनो रॅक्टल कर्करोग झाल्याचे निदान केले. वानराच्या जखमेतून पुसदृश्यस्त्राव वाहत होता. जखमेला दुर्गंधीही येत होती. उपचारानंतर वानराच्या जखमेतून दुर्गंध आणि स्त्राव येणे बंद झाले. वानराला पुढील उपचारासाठी त्यांना जामनेर येथे हलवले.
(हेही वाचा I.N.D.I. A. आणि N.D.A. एकाच दिवशी मुंबईत भिडणार)
आतापर्यंत डॉ. पाटील यांना दोन माकडांमध्ये हा कर्करोग आढळला आहे. वानर आणि माकडांमधील बदलती जीवनशैली या मागील कारण असल्याचे डॉ. संतोष पाटील म्हणाले. उत्साही पर्यटक माकडांना चिप्स आदी पदार्थ खाऊ घालतात. बाजारात उपलब्ध अन्नपदार्थांमध्ये पदार्थ टिकण्यासाठी रसायने वापरली जातात. दया म्हणून पर्यटकांनी वन्यजीवांना मानवी अन्नपदार्थ खाऊ घालू नये. माकडांना निसर्गात उपलब्ध असलेले अन्नपदार्थ पचतात.