- ऋजुता लुकतुके
आशिया चषकासाठी भारतीय संघ बंगळुरूमध्ये सराव करत आहे. रिषभ पंतही काही काळ संघाच्या शिबिरात सहभागी झाला होता. तेव्हाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत रस्ते अपघातानंतर बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत सराव करत आहे. अजून तो शंभर टक्के तंदुरुस्त नसला तरी त्याच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. आणि त्याने फलंदाजीचा सरावही थोडा बहुत सुरू केला आहे.
त्याचवेळी आशिया चषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचं शिबीरही नॅशनल क्रिकेट अकॅडमीतच सुरू होतं. त्यामुळे आपल्या जुन्या संघ सहकाऱ्यांना तिथं बघून रिषभला मोह आवरला नाही. आणि त्याने काही काळ संघाबरोबर सराव केला. हा व्हीडिओ बीसीसीआयनेच आपल्या ट्विटर खात्यावर प्रसिद्ध केला आहे.
यात रिषभ पंत, शार्दुल ठाकुर आणि कुलदीप यादव यांच्याबरोबर मैदानावर वेळ घालवताना दिसतोय. आणि त्यानंतर तो प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी गप्पाही मारतोय. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात रिषभ पंतला दिल्लीहून उत्तर प्रदेशच्या वाटेवर असताना मोठा रस्ते अपघात झाला होता. यात त्याच्या हाताला आणि पायाला मोठी दुखापत झाली. पण, दुखापतीतून सावरताना रिषभने मोठी जिगर दाखवली आहे. आणि उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे तंदुरुस्तीकडे त्याची वाटचालही जलदगतीने होत आहे. अलीकडेच १५ ऑगस्टच्या दिवशी एका स्थानिक क्रिकेट सामन्यात तो सहभागी झाला होता. आणि यात त्याने फलंदाजीही केली. आठ महिने क्रिकेटपासून दूर असतानाही त्याच्या खेळात अवघडलेपण नव्हतं. अर्थात, सामन्यासाठी तंदुरुस्त व्हायला त्याला अजून मेहनत घ्यावी लागणार आहे.
(हेही वाचा – Sachin Tendulkar Online Gaming Ads : सचिन तेंडुलकरने भारतरत्न परत करावा ! – बच्चू कडू का झाले आक्रमक ?)
दुसरीकडे भारतीय संघ आशिया चषकासाठी श्रीलंकेला रवानाही झाला आहे. पण, के एल राहुल अजूनही बंगळुरूमध्ये नॅशनल क्रिकेट अकॅडमीतच आहे. तो ४ सप्टेंबरला भारतीय संघात सामील होईल. तोपर्यंत बंगळुरूमध्ये राहून तो आपला तंदुरुस्तीचा कार्यक्रम पूर्ण करणार आहे. त्यामुळे भारताचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना राहुल खेळू शकणार नाही. भारताची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढत २ सप्टेंबरला श्रीलंकेत पलिक्कल इथं होणार आहे. तर ४ सप्टेंबरला भारताची लढत नेपाळशी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community