पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन! कसे असणार निर्बंध? वाचा

195

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. राज्यात काल एकाच दिवसात 43 हजार 183 नविन कोरोना रुग्ण सापडले. तर 249 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईसह पुण्यात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत उद्यापासून पुणे जिल्ह्यात उद्यापासून पुढील सात दिवसांसाठी मिनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे विभागाचे प्रशासकीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.

असे असतील उद्यापासून निर्बंध

  • सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी (पाच माणसांपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी)
  • संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पुर्णपणे संचारबंदी
  • संचारबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
  • अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून वगळले.
  • बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी संपूर्ण बंद
  • हॉटेलमधून पार्सल सेवा(होम डिलिव्हरी) सुरू राहणार
  • सार्वजनिक बससेवा ७ दिवसांसाठी बंद
  • सिनेमागृह, मॉल, धार्मिक स्थळे सात दिवस बंद
  • सर्व राजकीय कार्यक्रमांवर बंदी
  • लग्न आणि अंत्यविधी वगळून सर्व सामाजिक कार्यक्रमांवर बंदी
  • आधीपासून ठरलेले विवाह सोहळे ५० जणांच्या उपस्थितीत करण्याची मुभा
  • अंत्यविधीसाठी २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी
  • ३० एप्रिल पर्यंत शाळा बंद
  • १०वी, १२वी आणि इतर परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी विशेष खबरदारी घेणार

(हेही वाचाः मुंबईत रुग्णवाढीचा उच्चांक : दिवसभरात ८,६४६ रुग्ण, १८ जणांचा मृत्यू!)

कडक अंमलबजावणी करणार

या सर्व निर्बंधांची कडक अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. हे निर्बंध उद्यापासून पुढील सात दिवसांसाठी असून पुढल्या शुक्रवारी पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्यात येईल असे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

पुणे प्रशासन सज्ज

देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या या पुण्यात होत असून ही संख्या अजून वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यात लसीकरणाचा वेग हा वाढवण्यात आला असून, हा वेग वाढवण्यासाठी पुणे प्रशासन सज्ज असल्याचे ते म्हणाले.  १ एप्रिल रोजी ५७ हजारांपेक्षा जास्त लसीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांना रक्ताच्या चाचण्या करणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. प. महाराष्ट्रतील पाच जिल्ह्यांत बेड्स वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे महापालिकेतर्फे आरोग्य सेवा सुरळीतपणे पुरवण्यासाठी ४०० आरोग्य कर्मचा-यांची भरती करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सातारा,सांगली, सोलापुरात प्रादुर्भाव वाढत असून तेथील प्रशासनाशी संपर्क साधून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.