राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी, ४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी राज्यात लॉकडाऊन होणार की कठोर निर्बंध लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन?
राज्यात लॉकडाऊन करण्यावरून मतभेद पहायला मिळत असून, अनेकांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन करणे हे राज्याच्या हिताचे नसून, राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह ‘मिनी लॉकडाऊन’चा विचार सध्या सुरू आहे.
(हेही वाचा : मनसुख हिरेन प्रकरणाचे मीरा रोड कनेक्शन? )
असा असू शकतो मिनी लॉकडाऊन!
- सध्या राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीची वेळ वाढवून संध्याकाळी 7 ते सकाळी 8 पर्यंत करण्याचा विचार आहे. या वेळेतच दुकाने, हॉटेल, बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
- एकाच परिसरातील/विभागातील दुकाने दिवसाआड सुरू ठेवण्याचा विचार.
- एका गल्लीत एका रांगेतील सर्व दुकाने एका दिवशी सुरू राहतील, तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रांगेतील सुरू असतील.
- सर्वात जास्त फूट फॉल म्हणजेच गर्दीची ठिकाणे जसे मॉल, थिएटर्स, धार्मिक स्थळे, प्ले ग्राऊंडस, गार्डन्स आणि पिकनिक पॉईंट्सवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता.
- संक्रमणाचे केंद्र असलेल्या या ठिकाणांवर प्रशासन कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे.
- सर्व खाजगी ऑफिसला पुढच्या काही काळापुरते ‘वर्क फ्रॉम होम’ अनिवार्य करण्याचा विचार आहे. तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये रोटा पद्धतीने किंवा कमीत कमी क्षमतेने सुरू ठेवण्याच्या पर्यायाची चाचपणी सुरु आहे.
- सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन पूर्णपणे बंद करण्याबाबत अद्याप कोणताही विचार नाही. पण लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना परवानगी देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.