भारतातील यंदाचा मान्सून गेल्या ८ वर्षातील सगळ्यात नीच्चांकी असेल असा अंदाज देशातील दोन महत्त्वाच्या वेधशाळांनी वर्तवला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं याविषयीची बातमी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात पडलेला पाऊस हा काही दशकांतील सगळ्यात कमी पाऊस आहे.
अंदाजाप्रमाणे पाऊस खरंच कमी झाला तर याचा सगळ्यात विपरित परिणाम अन्नधान्याच्या किमती वाढण्यात होणार आहे. देशात सध्या तांदूळ, डाळी, ऊस (साखर) आणि भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही ३ ट्रलियन अमेरिकन डॉलरची आहे. पण, देशातील ७० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. शेतीला पाणी, पिण्याचं पाणी तसंच तलाव भरणं हे पावसामुळेच शक्य होतं.
पण, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही कमी पाऊस झाला तर देशात ८ टक्के कमी पाऊस होईल, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. ‘अल् निनोनं ऑगस्टच्या पावसावर विपरित परिणाम केला. तोच परिणाम कमी अधिक प्रमाणात सप्टेंबरमध्येही दिसून येण्याची शक्यता आहे. तसं झालं तर २०१५ नंतरचा सगळ्यात कमी पाऊस यंदा अनुभवायला मिळेल,’ हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.
(हेही वाचा I.N.D.I. A. आणि N.D.A. एकाच दिवशी मुंबईत भिडणार)
भारतीय हवामान विभाग सप्टेंबर महिन्याचा अंदाज येत्या ३१ ऑगस्टला जाहीर करणार आहे. यापूर्वी २६ जुलैला व्यक्त केलेल्या अंदाजात हवामान विभागाने संपूर्ण मान्सून हंगामात ४ टक्के कमी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. अल् निनो हा पॅसिफिक महासागरात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचा परिणाम आहे. तिथे समुद्राचं तापमान वाढल्यामुळे समुद्राकडून जमिनीवर वाहणारे वारेही कोरडे होत आहेत.
परिणामी, भारतात बाष्प वाहून येण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे अल निनो पॅटर्न प्रमाणे भारतातील पावसाचं प्रमाण अनियमित आहे. याच वर्षाचा पाऊस बघितला तर जून महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत ९ टक्के कमी पाऊस झाला. तोच जुलै महिन्यात अंदाजापेक्षा १९ टक्के जास्त सरासरी पाऊस झाला. शिवाय काही प्रांतांमध्ये पाऊस आणि इतर भाग कोरडे अशा घटनाही अलीकडे वाढत आहेत
Join Our WhatsApp Community