आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने (I.N.D.I.A. ALLIANCE) जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू केलेली नाही. पहिल्या 2 बैठका झाल्या, त्या महत्त्वाच्या होत्या. उद्याच्या बैठकीत इथून पुढे सामूहिक कार्यक्रम काय असावा, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या शक्यतेवेळी असा निर्णय झाला, तर काही लोकांवर ही जबाबदारी द्यावी लागेल. अन्य राजकीय घटक पक्षांशी संवाद साधून यातून आपण एकत्र जाऊ शकतो का, यासंदर्भातील अभ्यास करण्याबाबत काही लोकांवर जबाबदारी सोपवावी लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.
(हेही वाचा – I.N.D.I.A. ALLIANCE : सोनिया, राहुल गांधींना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नेणार का ?)
इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत होऊ घातली आहे. देशभरातील अनेक राजकीय नेते उद्या बैठकीसाठी मुंबईत येणार आहेत. मुंबईच्या ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ३० ऑगस्ट रोजी माध्यमांशी संवाद साधला. उद्याच्या बैठकीबाबत त्यांनी या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जागावाटपाविषयी सांगितले. (I.N.D.I.A. ALLIANCE)
याच पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीपूर्वीच केंद्र सरकारने २०० रुपयांनी गॅस सिलिंडरचा दर कमी केला. ‘इंडिया’ जसं जसं पुढे जाईल, तसं एक दिवस असा येईल, की केंद्र सरकार मोफत गॅस सिलिंडर देईल. मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास करण्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने नीति आयोगावर सोपविली आहे. हा मुंबई तोडण्याचा भाजपाचा मनसुबा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं किंवा केंद्रशासित करणं हा भाजपाचा डाव आता उघड झाला आहे. आम्ही सत्तेत असताना असा प्रस्ताव आणण्याची त्यांची हिंमत नव्हती. आत्ताही आम्ही हा प्रस्ताव मंजूर होऊ देणार नाही, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानपदासाठी अनेक जण उत्सुक
पंतप्रधान पदासाठी कोणते पर्याय आहेत, असा प्रश्न विचारला असता आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक पर्याय आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
यापूर्वी या आघाडीत २६ राजकीय पक्षांचा समावेश होता आता ती संख्या २८ इतकी झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. इंडिया आघाडीत ११ राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी आहेत. यामध्ये भाजपने तोडून मोडून सरकारे स्थापन केलेल्यांचा समावेश नाही. सर्व प्रमुख राजकीय पक्ष आमच्यासोबत आहेत. कोणाला विरोध करणे हाच केवळ आमचा अजेंडा नाही. आम्ही डेव्हलपमेंटल अलायन्स आहोत. (I.N.D.I.A. ALLIANCE) त्याचबरोबर देशातील ज्या हुकुमशाही शक्ती आहेत, त्यांना रोखण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत, असे पटोले म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community