पुरुषांपेक्षा महिला त्यांच्या त्वचेची जास्त काळजी घेतात. शिवाय त्या चेहरा सुंदर दिसावा यासाठी हायड्रेशनपासून मेकअप काढण्यापर्यंत प्रत्येक प्रक्रिया काळजीपूर्वक करीत असतात. त्यामुळे त्यांची त्वचा चांगली राहते. मात्र, त्वचेची काळजी घेत असताना अनेक महिला अशा काही चुका करतात; ज्यामुळे त्यांच्या त्वचेची गुणवत्ता कमी होऊ शकते. मात्र, त्यांनी जर या चुका केल्या नाहीत, तर त्यांची त्वचा नेहमीच चमकत राहू शकते. तेव्हा त्वचेची काळजी घेताना खालील चुका टाळा –
टॉवेलने चेहरा पुसणे
अनेकदा स्त्रिया आणि पुरुष चेहरा धुतल्यानंतर तो पुसण्यासाठी टॉवेलचा वापर करतात. पण, तुम्हाला माहिती आहे का, असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर जीवाणू (बॅक्टेरिया) येऊ शकतात. कारण- अनेकदा टॉवेल रोजच्या रोज धुतले जात नाहीत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एक तर तुम्ही चेहरा कोरडा करण्यासाठी रोज स्वच्छ व धुतलेला टॉवेल घ्या किंवा चेहरा हवेत कोरडा करा.
उत्पादनांचा चुकीचा वापर
त्वचेच्या काळजीसाठी वापरली जाणारी उत्पादने कशी वापरायची याबाबतची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, बरेच लोक आधी मॉइश्चरायझर आणि नंतर सीरम लावतात; जे चुकीचे आहे. नेहमी पातळ थराची उत्पादने आधी आणि जाड थराची उत्पादने नंतर लावणे गरजेचे असते. सीरमचा थर पातळ आहे म्हणून प्रथम ते लावा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.
बोटांनी उत्पादन काढणे
अनेक महिला जारमधून उत्पादन काढण्यासाठी बोटांचा वापर करतात; जे चुकीचे आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, असे केल्याने तुमच्या क्रीममध्ये जीवाणू मिसळले जाऊ शकतत. ते टाळण्यासाठी बोटांनी सीरम किंवा क्रीम काढण्याऐवजी स्कूप/स्पॅटुला वापरा किंवा हात पूर्णपणे स्वच्छ धुतल्यानंतरच जारमधून उत्पादने काढा.
पाणी न पिणे
डिहायड्रेशनमुळे अनेकदा लोकं पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा तहान लागल्यावर सोड्यावर आधारित पेय पितात. असे केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. वास्तविक तहान लागल्यास नारळ पाणी, साधे पाणी, रस इत्यादी नैसर्गिक पेये पिणे फायद्याचे ठरू शकते.
झोपताना चेहरा न धुणे
काही महिला रात्री उशिरा झोपताना मेकअप काढणे किंवा चेहरा धुणे विसरतात. असे केल्याने मेकअप रात्रभर त्वचेवर राहतो; ज्यामुळे चेहऱ्याला हानी पोहोचू शकते. याव्यतिरिक्त ते रात्री उद्भवणारी त्वचेची वाढ थांबवतात. त्यामुळे नेहमी मेकअप काढून आणि रात्री चेहरा धुऊन झोपत जा.