संभाजीनगर महानगरपालिकेत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अंत्यविधी झाल्यावर स्मशानभूमीतच मृत्यू प्रमाणपत्र देण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक जी श्रीकांत यांनी घेतला आहे. त्यामुळे यापुढे अंत्यविधीनंतर मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांची गैरसोय टळणार असून त्याकरिता सरकारी कार्यालयात खेपा माराव्या लागणार नाहीत.
मृत व्यक्तिंचे अंत्यसंस्कार करण्यासाठी महानगरपालिका मुख्य कार्यालय आरोग्य विभागाअंतर्गत जन्म आणि मृत्यू नोंदणी विभाग येथील स्मशान परवाना घेण्यासाठी 10 ते 12 किलोमीटर लांबून यावे लागते. यामुळे मोठी गैरसोय होत होती. नागरिकांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रत्येक स्मशानभूमी, कब्रस्तानमध्येच अंत्यविधीनंतर लगेचच मृत्यू प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नागरिकांना संभाजीनगर महानगरपालिका मुख्य कार्यालयात येण्याची गरज नाही.
(हेही वाचा- Ranjit Savarkar : रणजित सावरकर यांच्या स्वागताला अमरावती नगरी सजली)
शहरातील नागरिकांनी 1 सप्टेंबर 2023 पासून स्मशानभूमी आणि कब्रस्तानमध्येच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अंत्यसंस्काराची परवानगी घेऊन अंत्यविधी, दफनविधी झाल्यावर अंत्यविधी पत्र प्राप्त करून घ्यावे.यापुढे 31 ऑगस्टपासून नागरिकांनी अंत्यविधी परवानगीसाठी महानगरपालिका मुख्य कार्यालयात येण्याची गरज नाही तसेच यापुढे जन्म-मृत्यू नोंदणी विभागामार्फत स्मशान परवाना दिला जाणार नाही. याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन संभाजीनगर मनपा प्रशासनाने केले आहे तसेच यासंदर्भात काही अडचण आल्यास नागरिकांनी झोन कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधावा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community