– संतोष वाघ
मुंबई शहर आणि उपनगर यांसह ठाणे, नवी मुंबईत पोलीस (Mumbai Police) असल्याचे सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पश्चिम उपनगरातील डी. एन. नगर पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेला गुन्हेगार हा आंबिवलीच्या इराणी वाडीत राहणारा आहे. डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने जीवाची बाजी लावून या गुन्हेगाराला इराणी वाडीतून अटक करून मुंबईत आणले, या कारवाई दरम्यान पोलीस पथकावर स्थानिक नागरिकांनी हल्ला करून आरोपीला पळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला आहे. फिरोज फय्याज खान (६२) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. फिरोज याच्यावर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ३५ पेक्षा अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
(हेही वाचा – Death Certificate : स्मशानात अंत्यविधीनंतर मिळणार मृत्यू प्रमाणपत्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय)
फिरोज खान याने अंधेरी पश्चिम डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० ऑगस्ट रोजी किशनकुमार बसवराज हल्ली (२१) याला वाटेत अडवून पोलिस असल्याचे सांगून किसन कुमार जवळ असणारे एक लाख रुपये घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना घटनास्थळावर सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. या फुटेज मध्ये आरोपी फिरोज खान याची ओळख पटविण्यात आली व त्याची माहिती काढण्यात आली असता फिरोज हा आंबिवली येथील इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती मिळाली. फिरोजच्या अटकेसाठी डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. वाहिद पठाण, सपोनि. राकेश पवार यांच्या सह १४ जणांचे पथक तयार करण्यात आले. (Mumbai Police)
पोलीस पथकाने आपल्या खबरीला फिरोज च्या मागावर पाठवले होते, फिरोज इराणी वस्तीतच असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. परंतु इराणी वस्तीचा इतिहास बघता पोलिसांनी फिरोजला अटक करण्यासाठी संपूर्ण काळजी घेतली होती. यासाठी पोलीस पथकाने पोलीस वाहनाचा वापर न करता स्कुल व्हॅन आणि एक खाजगी मोटारीसह पोलीस पथक साध्या वेशात आंबिवलीच्या इराणी वस्तीत दाखल झाले. फिरोज हा घरात असल्याची माहिती खबऱ्याने देताच पोलीस पथक इराणी वस्तीत शिरले व फिरोजला घरातून ताब्यात घेऊन स्कुल व्हॅन मध्ये बसवणार तेवढ्यात वस्तीत पोलीस घुसल्याची खबर पसरली आणि स्थानिकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून सोडविण्यासाठी पोलिस व व्हॅनवर दगडफेक सुरू केली. पोलिस पथकाने त्यांना हुलाकवणी देत फिरोजला व्हॅनमध्ये कोंबून इराणी वस्तीतून बाहेर पडले. पोलीस पथक इराणी वस्तीत शिरल्यापासून तर फिरोजच्या मुसक्या आवळून त्याला व्हॅन मध्ये बसवत असतांना पोलिसांच्या ताब्यातून फिरोजला सोडवण्यासाठी स्थानिकांनी पोलिसांवर केलेला हल्ला हा सर्व थरार इराणी वस्तीत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून बुधवारी हे फुटेज समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. पोलिसांनी जीवाची बाजी लावत इराणी वस्तीत जाऊन केलेल्या कारवाईचे पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (Mumbai Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community