Rahul Gandhi : वीर सावरकरांच्या अवमानप्रकरणी राहुल गांधींकडून माफी वदवून घेणार का? – एकनाथ शिंदे गटाचे उद्धव ठाकरेंना आव्हान 

127

काँग्रेस नेते राहुल गांधी मागील वर्षी ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले होते, तेव्हा त्यांनी वीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत त्यांचा अवमान केला होता, ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती, याप्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात काही ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा गुरुवारी, ३१ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आले आहेत. या बैठकीचे यजमान पद उबाठा गटाने घेतले आहे. अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. उबाठा गट वीर सावरकरांचा अवमान केल्याप्रकरणी राहुल गांधींकडून माफी वदवून घेणार का? असे एकनाथ शिंदे गटाने म्हटले आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणी उद्धव ठाकरे राहुल गांधींकडून माफी वदवून घेणार का, असा सवाल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मुंबई आहे आणि याच शहरात त्यांचा मुलगा बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांना विरोध केला, त्यांच्यासमोरच लाचारी करत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना उद्धव ठाकरे माफी मागायला लावणार का? इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जमलेले किती नेते बाळासाहेबांच्या स्मारक स्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहणार? असा सवाल केसरकर यांनी केला.

(हेही वाचा Eknath Shinde : कुणीतरी म्हणाले की, आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी खूप चेहरे, रावणालाही अनेक चेहरे होते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर कडवे आव्हान उभे करण्याच्या जिद्दीने एकत्र आलेल्या इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले. इंडिया आघाडीची बैठक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडायला तयार झालेली श्वापदांची टोळी आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. तर लालुप्रसाद यादव, समाजवादी पक्ष, काँग्रेस या भ्रष्ट नेत्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत. हा बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात दगा आहे. हे सर्व पक्ष घराणेशाहीचा परिपाक असून  या आघाडीत सामील झालेल्या पक्षांपैकी १७ पक्ष हे घराणेशाही पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी टीका गजानन  कीर्तीकर यांनी यावेळी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारधारेला विरोध केला. एक वेळ पक्ष विसर्जित करेन, पण काँग्रेससोबत जाणार नाही, अशी भूमिका बाळासाहेबांनी आयुष्यभर घेतली.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर अशा हेटाळणीने करणाऱ्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत त्यांचे  स्वागत आदित्य ठाकरेंनी करावे, हे दुर्दैवी आहे, असेही कीर्तिकर  म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.