देशभरातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (I.N.D.I.A.) आघाडीची बैठक मुंबईत पार पडत असून या बैठकीच्या संपूर्ण प्रसिध्दीची जबाबदारी ही काँग्रेस पक्षावर आहे. परंतु या प्रसिध्दीत ‘इंडिया’ आघाडीऐवजी काँग्रेस पक्ष स्वत: हात धुवून घेत आहे. काँग्रेस पक्षाने ‘इंडिया’ आघाडीच्या प्रसिध्दीत काँग्रेस पक्षाची जास्तीत जास्त प्रसिध्दी कशी होईल याचा विचार करत जाहिराती बनवल्या आहे. त्यामुळे या जाहिरातींमध्ये काँग्रेसचे हाताचे चिन्ह आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचीच छायाचित्र असलेले बॅनरच्या जाहिराती प्रत्येक ठिकाणी प्रसिध्द केल्या असून आघाडीतील सर्व नेत्यांच्या छायाचित्रांना जेवढी जागा नाही तेवढी आकाराच्या जागेत वडेट्टीवार यांचे छायाचित्र प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या नावाने काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वत:चे महत्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
‘इंडिया’ (I.N.D.I.A.) आघाडीच्या मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे यजमानपद काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे आहे. यामध्ये शिवसेना उबाठा गटाकडे हॉटेलची व्यवस्था सोपवली आहे, तर काँग्रेसकडे प्रसिध्दी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे वाहनांची व्यवस्था अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना उबाठा गटाच्यावतीने हॉटेलची सर्व व्यवस्था केली असली तरी प्रत्यक्षात प्रसिध्दीची व्यवस्था असलेल्या काँग्रेस पक्षाकडून ‘इंडिया’ आघाडीसह स्वत:च्या पक्षाचीही प्रसिध्दी या जाहिरातींच्या माध्यमातून करून घेत असल्याचे दिसून येत आहे.
‘इंडिया’ (I.N.D.I.A.) आघाडीच्या बैठकीची प्रसिध्दी करण्यासाठी काँग्रेस पक्षाने मुंबईतील विविध बस स्टॉपवर जाहिराती प्रदर्शित केल्या आहेत. या जाहिरातीमध्ये ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ अशा प्रकारचे स्लोगन देण्यात आले आहे. त्याच्या शेजारीच एक वर्तुळ तयार करत ‘इंडिया’ आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. मात्र या स्लोगनच्या खाली विजय वडेट्टीवार, विपक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा अशाप्रकारे उल्लेख करत त्याशेजारी वडेट्टीवार यांचा छायाचित्र प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामुळे आघाडीतील सर्व प्रमुख त्यांच्या छायाचित्रांच्या जागेपेक्षा मोठ्या आकाराचा फोटा हा वडेट्टीवार यांचा असून त्याशेजारी काँग्रेसच्या हाताचा पंजा हे चिन्हही प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामुळे ही जाहिरातबाजी काँग्रेस पक्षाची आहे की ‘इंडिया’ आघाडीची आहे असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला असून ‘इंडिया’ आघाडीच्या नावाखाली काँग्रेसने मुंबईभर स्वत:ला झळकून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट होत आहे.
त्यामुळे उध्दव ठाकरे यांची शिवसेना बैठका आणि जेवणावळीसह देशातील विविध पक्षांच्या नेत्यांचे आदरतिथ्य राखण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेस पक्ष मात्र दुसरीकडे स्वत:च्या पक्षांची प्रसिध्दी करून आगामी निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु केल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community