- ऋजुता लुकतुके
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकास दर ७.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आणि विकास दराच्या निकषावर भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत, म्हणजेच एप्रिल ते जून दरम्यान देशाचा आर्थिक विकास दर ७.८ टक्के असल्याचं सरकारी आकडेवारीतून समोर आलं आहे. हा विकास दर जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादनावर आधारित आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने हे आकडे प्रसारित केले आहेत. अर्थतज्ज्ञांनी विकासदर ७.७ ते ८.५ दरम्यान राहील असा अंदाज व्यक्त केला होता. त्याचबरोबर भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. याच कालावधीत चीनची अर्थव्यवस्था ६.३ टक्के दराने वाढली.
India’s GDP growth rate for Q1-FY 2023-24 at 7.8 per cent, says the Government. pic.twitter.com/jvhcwMIBaH
— ANI (@ANI) August 31, 2023
आता पहिल्या तिमाहीत कुठले औद्योगिक क्षेत्र पुढे होते ते पाहूया. पहिल्या तिमाहीत कृषी क्षेत्राचा विकास दर ३.५ टक्के इतका होता. गेल्यावर्षी याच कालावधीत हा विकासदर २.५ टक्के इतका होता. म्हणजेच कृषी क्षेत्रात वाढ झालेली पाहायला मिळाली. पण, त्याचवेळी महत्त्वाचे उत्पादन क्षेत्र मात्र ढेपाळले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्राची वाढ ४.७ टक्के इतकी आहे. तीच गेल्यावर्षी या कालावधीत ६.१ टक्के इतकी होती. सध्या विकासदर ७ टक्क्यांच्या पुढे असला तरी येणाऱ्या तिमाहीत तो पुन्हा खाली येईल असा जाणकारांचा होरा आहे. कारण, हवामानातील बदलांमुळे यंदा मान्सून चांगला झालेला नाही. त्यामुळे अन्नधान्याच्या किमतींवर परिणाम होतोय. महागाई वाढतेय. तसंच खाणकामही मंदावलंय. देशांतर्गत उत्पादन कमी झाल्यामुळे निर्यातीवर परिणाम होतोय. आणि या सगळ्याचे पडसाद जुलै ते सप्टेंबर महिन्यात दिसून येतील.
राष्ट्रीय सांख्यिकी विभाग हा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. तिमाही संपल्यानंतरच्या दुसऱ्या महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी हा विभाग आपल्या आधीच्या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध करत असते. रिझर्व्ह बँकेनं पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकासदर ६.७ टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता. तर पुढच्या म्हणजे जुलै ते सप्टेंबर तिमाहीत विकासदर ७.२ टक्के असेल असा मध्यवर्ती बँकेचा अंदाज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community