ऋजुता लुकतुके
आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी २ सप्टेंबरला रंगणार आहे. त्याविषयी चाहत्यांबरोबरच खेळाडूंनाही उत्सुकता आहे. दोन्ही संघ सध्या फक्त आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्येच खेळतात. त्यामुळे २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर चाहत्यांना थेट आता भारत – पाक सामन्याची पर्वणी मिळणार आहे.
भारताने पाकिस्तान विरुद्ध शेवटचे तीनही सामने जिंकले आहेत. पण, प्रत्येक सामना हा वेगळा असतो. आणि पाकिस्तान सारख्या गोलंदाजांच्या तोफखान्याला सामोरं जायचं असेल तर फलंदाजाने आपला सर्वोत्तम खेळच करायला हवा, असं विराटने या सामन्याविषयी बोलून दाखवलं आहे.
‘पाकिस्तानची गोलंदाजांची फळी मजबूत आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता पाकिस्तानी संघाकडे आहे. त्यामुळे पाकिस्तान संघासाठी खास तयारी करण्याची गरज आहे,’ असं विराटने पत्रकारांशी गप्पा मारताना सांगितलं. स्वत: विराट कोहली डिसेंबर २०२२ पासून १४ एकदिवसीय सामने खेळला आहे. आणि यात ५० च्या सरासरीने त्याने ५५४ धावा केल्या आहेत.
(हेही वाचा- Rainfall : सप्टेंबर महिन्यात लवकर पाऊस गाशा गुंडाळणार?)
अलीकडे फलंदाजीतील त्याचा बदललेला दृष्टिकोण सांगताना विराट म्हणतो, ‘मी माझी वैयक्तिक कामगिरी कशी सुधारेल यासाठी प्रयत्न करतो. प्रत्येक सरावाचा दिवस, सामन्याचा दिवस यात मी कालच्यापेक्षा चांगला खेळलो का, हाच प्रश्न मी स्वत:ला विचारतो. असाच दृष्टिकोण ठेवल्यामुळे इतकी वर्षं मी खेळू शकलो आहे.’ धावसंख्या किंवा विक्रम यांचं उद्दिष्टं ठेवलं तर अशी कारकीर्द अल्पजिवी ठरू शकते, असं विराटला वाटतं. याउलट फक्त तेव्हाच्या कामगिरीचा विचार केला तर दीर्घकाळ तुम्ही तग धरू शकता, असं त्याचं म्हणणं आहे.
‘कुठच्याही खेळात असं नसतं की, तुम्ही एका ठरावीक ठिकाणी पोहोचलात की झालं. म्हणूनच मला वाटतं कालच्या पेक्षा आज चांगलं करणं हेच ध्येय असायला पाहिजे. चांगली कामगिरी करताना जे विक्रम होतील तो तुमच्या कामगिरीचा एक परिणाम असेल, तेच उद्दिष्टं असू शकत नाही,’ असं विराट शेवटी म्हणाला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी तो पत्रकारांशी अनधिकृतपणे गप्पा मारत होता. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर मिळालेल्या विश्रांतीचा फायदा झाल्याचं विराटने बोलून दाखवलं.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community