ऋजुता लुकतुके
भारतीय रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष म्हणून प्रथमच एका महिलेची म्हणजे जया वर्मा – सिन्हा यांची निवड झाली आहे. अनिल कुमार लाहोटी यांच्या नंतर आता त्या १ सप्टेंबरपासूनच या पदावर रुजू होतील. रेल्वे बोर्डातील ही नेमणूक मानाची आणि रेल्वेमध्ये सगळ्यात जास्त मोबदल्याची आहे.
सध्या त्या रेल्वे बोर्डाच्या ऑपरेशन्स आणि बिझिनेस डेव्हलपमेंट विभागाच्या सदस्य होत्या. पश्चिम बंगालमध्ये बालासोर इथं झालेल्या रेल्वे अपघाताच्या वेळी जया वर्मा – सिन्हा प्रकाशझोतात आल्या होत्या. रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेवर टीका होत असताना धीटपणे मीडियासमोर येऊन त्यांनी रेल्वेची जटील सिग्नल यंत्रणा मीडियाला समजावून सांगितली होती.
Jaya Verma Sinha, Indian Railway Management Services (IRMS), Member (Operations & Business Development), Railway Board appointed as Chairman & Chief Executive Officer (CEO), Railway Board: Govt of India pic.twitter.com/ERczDOERtY
— ANI (@ANI) August 31, 2023
जया यांनी आपला पदव्योत्तर अभ्यासक्रम अलाहाबाद विद्यापीठातून पूर्ण केला आहे. आणि त्यानंतर १९८८ मध्ये त्या रेल्वे ट्राफिक सेवेत रुजू झाल्या. देशातील सगळ्यात मोठी प्रशासकीय यंत्रणा असलेल्या रेल्वेत ट्राफिक सेवा ही आव्हानात्मक समजली जाते.
जया यांनी आपल्या कार्यकालात पूर्व रेल्वे, आग्नेय रेल्वे आणि उत्तर रेल्वेसाठी सेवा बजावली आहे. भारतीय रेल्वेनं कोलकाता ते ढाका दरम्यान चालवलेली मैत्री एक्सप्रेस हा त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च टप्पा होता. या दरम्यान त्या ढाका इथं भारतीय दूतावासात रेल्वे सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. तिथं त्यांनी चार वर्षं काम केलं.
Join Our WhatsApp Community