मुंबई प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता देशात बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. मुंबईत इंडियाची बैठक होत आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीचीही बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी महायुतीतील अनेक घटक पक्ष देखील या बैठकीसाठी उपस्थित होते. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या मुंबईत केंद्रीत झाल्याचं दिसून येत आहे.मुंबईतील महायुतीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्रिपणे सामोरे जाऊन राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा ठराव संमत करण्यात आला. याशिवाय चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेबद्दल इस्रोतील सर्व शास्ज्ञांच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मित्रपक्षांचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
(हेही वाचा- War Room : सरकारी रुग्णालयांतील गर्दीवर नियंत्रणासाठी आता ‘वॉर रूम’)
तसेच गेली ९ वर्षे देशाची अविरत सेवा करून देशात सुशासन आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण केल्याबद्दल, तसेच देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. राज्यात महायुती सरकारने केलेली विकासकामे आणि घेतलेले लोकाभिमुख निर्णय थेट लोकांपर्यंत पोहचवून पुन्हा एकदा केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.