I.N.D.I.A. Alliance : ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी….!

शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि मंत्री उदय सामंत यांची टीका.

213
I.N.D.I.A. Alliance : ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी....!
I.N.D.I.A. Alliance : ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी....!

देशभरातील सर्व भ्रष्ट नेते मुंबईत पर्यटनासाठी आले आहेत. एकेकाळी वंदनीय बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या नेत्यांची सरबराई करण्यासाठी हिंदुहृदयसम्राटांचा मुलगाच हांजी हांजी करत फिरत आहे. त्यामुळे या दुभंगलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांचा चेहरा जनतेसमोर आला आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे एका संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना केली.

I.N.D.I.A. च्या प्रत्येक अक्षरामध्येही बरीच टिंब आहेत. हे टिंबच त्यांच्यातली फूट दर्शवतं, असे सांगत या आघाडीने कितीही प्रयत्न केले, तरी २०२४ मध्ये लोकसभेत आम्ही पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्त्वाखाली आम्ही लोकसभेच्या ३७५ जागा जिंकू आणि महाराष्ट्रातही २१५ पेक्षा जास्त आमदार निवडून आणू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेने उद्धव गटाला दिलेल्या आव्हानाचाही पुनरुच्चार केला. मुंबईत आलेल्या नेते मंडळींना उद्धव यांनी बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी नेऊन त्यांच्या स्मृतिंना वंदन करायला लावावं. तेवढी धमक उद्धव यांच्यात आहे का, असा सवालही त्यांनी पुन्हा उपस्थित केला. तसंच ही आघाडी भ्रष्ट नेत्यांची आघाडी असून जनता त्यांच्या या स्टंटला भूलणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

घोटाळेबाजांची टोळी एकत्र…

देशातील मोठमोठे घोटाळे करणाऱ्या घोटाळेबाजांची टोळी मुंबईत एकत्र आली आहे. चारा घोटाळा, टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा, दिल्ली दारू घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, मुंबईतल्या जंबो कोविड सेंटरचा घोटाळा असे कित्येक लाख कोटी रुपयांचे घोटाळे करणारे २६ पक्षांचे चाळीस चोर एकत्र आल्याचा आरोपही खा. शेवाळे यांनी केला.

(हेही वाचा – DCM Ajit Pawar : केंद्रसरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक)

मुंबई महाराष्ट्राचीच…..!

निवडणुका जवळ आल्या की, पावसाळ्यातल्या बेडकांसारखे काही नेते ‘केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी डाव आखत असल्या’ची ओरड करतात. पण, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, हे फक्त याच लोकांना वाटत असतं, असा शेलका आहेरही उदय सामंत यांनी विरोधकांना दिला. आम्हीही महाराष्ट्रात राहतो. आमचंही मुंबईवर प्रेम आहे. त्यामुळे मुंबई तोडण्याची भाषा करणाऱ्यांचाच तसा हेतू आहे की काय, अशी शंका आता आम्हाला येते, असा प्रतिहल्लाही त्यांनी यावेळी चढवला.

पर्यटन करा आणि परत जा….!

मुंबईत वर्षभर पर्यटक येतात आणि पर्यटनाचा आनंद लुटतात. आताही हे देशभरातील नेते पर्यटनासाठी आले आहेत. आदित्य ठाकरेंनी त्यांना राणीच्या बागेतील पेंग्विन दाखवावेत आणि परत पाठवावं. पंतप्रधान मोदींचा सामना करण्याची कुवत आणि ताकद यापैकी एकाही नेत्यामध्ये नाही. या नेत्यांनी फक्त आपापल्या मुलांची राजकीय भवितव्यं टिकवण्यासाठी या बैठकीचा घाट घातला आहे. पण, त्यांनी पर्यटन करावं आणि परत जावं, असा सल्लाही खा. शेवाळे यांनी दिला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.