- वंदना बर्वे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने संसदेचे विशेष सत्र बोलाविण्याची अचानक घोषणा केल्यामुळे विरोधी पक्षांना ४४० व्होल्टचा शॉक बसला आहे. सरकारने अधिवेशनाचा अजेंडा जाहीर केला नसला तरी सरकार काही तरी मोठ्ठ करण्याच्या मूडमध्ये आहे, अशी चर्चा आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपायला २० दिवसही पूर्ण होत नाही तोच केंद्रातील मोदी सरकारने १८ सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेने केवळ विरोधी पक्षांनाच नव्हे तर दस्तुरखुद्य भाजपच्या नेत्यांनाही मोठा शॉक लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कामकाज करण्याचा इतिहास बघितला तर, काही तरी मोठ्ठ करण्यासाठी केंद्र सरकारने हे विशेष अधिवेशन बोलाविले असल्याची चर्चा आहे. यामुळे मोदी सरकार नेमके काय करणार आहे? असा प्रश्न विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबतच सामान्य जनतेलाही पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा कधी मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते अशाच प्रकारे अचानक काही तरी करीत आले आहेत. मग तो नोटाबंदीचा निर्णय असो किंवा पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईक असो, सरकारने असेच निर्णय घेतले ज्याने लोक आश्चर्यचकित झाले.
(हेही वाचा – National Education Policy : पाठ्यपुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्यास सेप्टेंबरपर्यंतची मुदत)
यावेळीही केंद्र काही मोठा निर्णय घेणार आहे, हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याने स्पष्ट झाले आहे. मात्र, जोपर्यंत याबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्ट वक्तव्य येत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची अटकळ टाळावी. दरम्यान, विरोधी पक्षांकडून अद्याप तरी ठोस अशी प्रतिक्रिया आलेली नाही. इंडिया आघाडीतील २८ पक्षांचे ६२ नेते सध्या मुंबईतील बैठकीत उपस्थित आहेत. ही बैठक शुक्रवारी संपणार आहे. यानंतर विरोधक नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community