महायुतीच्या माध्यमातून घेतलेले निर्णय हे निश्चितच राज्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हिताचे असतील. शेतकऱ्यांच्या हितासाठी एक रुपयात विमा कवच करण्याचा निर्णय देशात सर्वात प्रथम महाराष्ट्रातील महायुती सरकारने घेतला आहे. त्यामुळे जनतेसाठी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी महायुतीच्या सभेत केले. शुक्रवार (१ सप्टेंबर) वरळी येथे महायुतीची सभा पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मार्गदर्शन केले.
एक नवा विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि देशात काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यात कोणतीही अडचण किंवा संभ्रम नाही. लोकसभेसाठी राज्यात आपल्या सर्वांचे उद्दिष्ट हे सर्व ४८ जागांचे आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण निश्चितपणे एकत्रित काम करू, असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. नव्या विचाराने जेव्हा आपण काम करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला एकत्रित होऊन काम करायला हवे. यामागे झालेली लढत हा इतिहास झाला. पुढील काळात देशाचे भवितव्य घडवायचे असेल तर तसे उद्दिष्ट घेऊन काम करायला हवे.
(हेही वाचा – Sudhir More : माजी नगरसेवक सुधीर मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल)
येणाऱ्या निवडणुकीत आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. ती आव्हाने पेलण्याची क्षमता महायुतीमधील प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे. जिल्हा, तालुका पातळीवर काम करायला हवे. जिथे महायुतीचा उमेदवार आहे तिथे तीनही पक्षाच्या मतदारांनी मतदान करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे, असेही मत सुनिल तटकरे यांनी मांडले. अलिकडच्या काळात ज्यांना राजकीय कावीळ झाली आहे, ते महाराष्ट्रापासून मुंबई बाजूला काढण्याचा मुद्दा सांगून आभास निर्माण करत आहेत. मात्र, महायुतीच्या माध्यमातून घेतलेले निर्णय हे मुंबईच्या आणि राज्याच्या हिताचे असतील. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून मिळवलेला महाराष्ट्र आपण मुंबईसहित अबाधित ठेवू, असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community