- ऋजुता लुकतुके
ॲथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने सुवर्ण जिकलं तर पाक ॲथलीट अर्शद नदीमने रौप्य. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांबद्दल आदर व्यक्त केला आहे.
टोकयो ऑलिम्पिकपासून भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पाक भालाफेकपटू अर्शद नदीम यांच्यातील मैदानावरील स्पर्धेची चर्चा रंगू लागली आहे. स्पर्धेच्या पलीकडे दोघांमध्ये मैत्रीचे संबंध आहेत. टोकयोमध्येही ते दिसले होते, जेव्हा दोघांच्या भाल्याची सरमिसळ झाली होती. आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यानचा एक किस्सा नीरज चोप्राने अलीकडेच पत्रकारांशी बोलताना सांगितला आहे. त्यातून दोघांमधील मैत्रीचे संबंध आणखी अधोरेखित होतात.
अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने ८८.१७ मीटरची भालाफेक केली. आणि अर्शद नदीम त्याच्यापेक्षा काहीच मीटर मागे होता. त्याला रौप्य पदक मिळालं. स्पर्धा संपल्यानंतर सुवर्ण विजेता नीरज आणि कांस्यपदक विजेता झेक रिपब्लिकचा याकूब या दोघांकडे त्यांच्या देशाचे ध्वज होते. ते अंगाभोवती लपेटून दोघांनी आनंद व्यक्त केला, फोटो काढले. पण, नेमका अर्शदकडे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज नव्हता.
त्यामुळे तो सगळ्यांपासून दूर उभा होता. तेव्हाची एक आठवण नीरजने पत्रकारांना सांगितली. ‘मी माझ्या संघ सहकाऱ्यांबरोबर तो क्षण साजरा करत होतो. तितक्यात मी पाहिलं की, अर्शद एकटाच दूर उभा होता. तो फोटोही काढत नव्हता. मग मीच त्याला जवळ बोलवलं. आणि याकूबही तिथेच होता. मी आमच्या तिघांचा फोटो काढून घेतला. अर्शदलाही आनंदात सहभागी करून घेतलं,’ नीरजने तेव्हाचा एक किस्सा पत्रकारांना सांगितला.
स्पर्धेच्या आधी आणि स्पर्धेनंतरही आम्ही एकमेकांशी मित्रासारखे वागतो, हे सांगायला नीरज विसरला नाही. ‘मी आणि अर्शद जिंकण्यासाठी आणि स्वत:चा खेळ चांगला व्हावा म्हणून खेळतो. यात एकमेकांशी बरोबरी किंवा स्पर्धा करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आमच्यात मनमोकळ्या गप्पा होऊ शकतात,’ नीरजने दोघांच्या मैत्रीविषयी बोलताना सांगितलं.
आपल्या आगामी स्पर्धा आणि पॅरिस ऑलिम्पिकची तयारी याबद्दलही नीरज मोकळेपणाने बोलला. ‘आता माझा भर मी आतापर्यंत जी विजेतेपदं मिळवली आहेत ती राखण्यावर असेल. एकदा विजेतेपद मिळवणं हे कठीणच असतं. पण, ती राखण्यात तुमचा कस लागतो. कारण, स्पर्धा वाढलेली असते. आणि तुमच्याकडून अपेक्षाही वाढलेल्या असतात. पण, मला आता मेहनतीत कमी पडायचं नाही. आणि विजयाची साखळी तुटू द्यायची नाहीए,’ नीरज म्हणाला.
अलीकडेच नीरजने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकलं आहे. तर मानाच्या डायमंड लीग स्पर्धेतही त्याला अंतिम फेरीत विजयाची संधी आहे. आगामी काळात त्याला आशियाई क्रीडास्पर्धा आणि पुढे डायमंड लीगच्या अंतिम फेरीची तयारी करायची आहे.