भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघातून सुनील देवधर यांना उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता धूसर असून, २०२४ ला सार्वत्रिक निवडणुकीच्या हिशोबाने भाजपाने ही तयारी चालवली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव राहिलेले देवधर स्वतः या जागेसाठी इच्छुक आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या फेररचनेमध्ये देवधर यांना स्थान दिले नाही. याउलट त्यांना पुणे मतदारसंघातून लोकसभा लढवण्याची सूचना करण्यात आली आहे.
भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सुनील देवधर यांच्याकडे त्रिपुराची जबाबदारी सोपवली होती. दोन दशकांची डाव्यांची सत्ता मोडीत काढण्यात देवधर यांच्या कुशल राजकीय आखणीमुळे भाजपाला यश आले. त्यांच्या राजकीय व्यवस्थापकीय कौशल्याचे भाजपामध्येच नव्हे तर, अन्य पक्षांतही कौतुक झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी देवधर यांनी पार पाडली होती. भाजपासाठी संघटनात्मक आव्हान असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये देवधर सध्या कार्यरत आहेत.
(हेही वाचा – Jalna Maratha Andolan : जालन्यातील घटना हे विरोधकांचं षडयंत्र नाही ना…?)
पुणे का महत्त्वाचे?
- कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तेथून गिरीश बापट सलग पाचवेळा विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांना लोकसभेला संधी देण्यात आली. त्यांच्या जागेवर आमदार झालेल्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तेथे पोटनिवडणूक झाली.
- या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करून जबरदस्त धक्का दिला होता. २८ वर्षे भाजपकडे राहिलेला हा मतदारसंघ गमावल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार निवडीबाबत भाजपाकडून अधिक दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे सुनील देवधर यांना संधी दिली जाणार असल्याचे कळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community