राज्यातील सर्वात मानाची महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा स्पर्धेच्या आयोजनाचा मान मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्याला मिळाला आहे. १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडणार आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि उस्मानाबाद तालीम संघाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची ३१ जून रोजी सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बहुमान धाराशिव जिल्ह्याला मिळावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती.
अखेर हा बहुमान धाराशिवला मिळाला. त्यानुसार आता १ ते ५ नोव्हेंबर असे पाच दिवस शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडासंकुलावर कुस्तीचा थरार रंगणार आहे. उद्घाटन व समारोपासाठी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत वेगवेगळ्या जिल्ह्यांतील ४५ संघांचे मिळून तब्बल ९०० पैलवान सहभागी होतील. ज्यात साडेचारशे खेळाडू माती गटाचे, तर उर्वरित साडेचारशे गादी गटाचे असतील. चांदीची मानाची गदा व ३० लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी असे पहिल्या बक्षिसाचे स्वरूप आहे, तर उपविजेत्यास ट्रॅक्टर बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धा आयोजनाचा मान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व धाराशिव कुस्ती तालीम संघास मिळाला आहे. तब्बल १ लाख कुस्तीप्रेमी प्रेक्षक बसतील, अशी तगडी व्यवस्था क्रीडासंकुलावर करण्यात येईल, असे आयोजक पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.2 कोटींची बक्षिसे…महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धा २० गटांमध्ये होईल. या प्रत्येक गटातील विजेत्या पैलवानास बुलेट, तर उपविजेत्यास अन्य कंपनीची दुचाकी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. सोबतच १२ लाखांची उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार आहेत, असे आयोजक पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
(हेही वाचा Narendra Modi : देश 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास)
Join Our WhatsApp Community