Drought : राज्य दुष्काळाच्या वाटेवर…

143
  • नित्यानंद भिसे

सध्या राज्याला पावसाने हुलकावणी दिली आहे. आधीच राज्यात मान्सूनचे आगमन होण्यासाठी जुलै महिना उजाडावा लागला. या महिन्यात ज्या प्रमाणात पाऊस पडला त्याने कोकण भागात समाधान व्यक्त झाले, मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, पण ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीच्या पाण्यासाठी हा पाऊस अखंडित सुरु राहणे आवश्यक होते. पण दुर्दैवाने पावसाने ऑगस्ट महिन्यात जी हुलकावणी दिली, त्याने राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रसंगी कृत्रिम पाऊस पाडण्याची मानसिकता निर्माण केली आहे.

राज्यातील मोठे, मध्यम, लघु पाटबंधारे प्रकल्पात ६१ % पाणी साठा

महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीच्या ८९% पाऊस झाला आहे. मागील वर्षी सरासरीच्या १२२.८% पाऊस झाला होता. कृषी विभागाने १८ ऑगस्ट रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या माहितीप्रमाणे, राज्यात १३९.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९१% पेरणी झाली आहे. राज्यात ६ जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, त्यामध्ये कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे, तर ७५ ते १००% पाऊस झालेले १३ जिल्हे आहेत त्यातील पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत, मात्र अजून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ओला झाला नाही. १५ जिल्ह्यांमध्ये ५० ते ७५% पाऊस झाला आहे. ज्यात काही जिल्हे पश्चिम महाराष्ट्र आणि काही उत्तर महाराष्ट्रातील आहेत, तर राज्यात २५ ते ५०% पाऊस झालेले १३ तालुके आहेत. ज्यामध्ये विदर्भातील तालुके आहेत. महाराष्ट्रात २५ जुलै ते १७ ऑगस्ट या कालावधीत सलग २१ दिवस पावसामध्ये खंड पडलेल्या महसूल मंडळांची संख्या ४१ एवढी आहे. नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमधील ही ४१ महसूल मंडळे आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १२ महसूल मंडळांचा समावेश आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पावसाची प्रचंड गरज आहे. सध्या राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात ६१% पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ८०% पाणीसाठा होता. सध्या राज्यात ३२९ गावे आणि १२७३ वाड्यांमधून ३५१ टँकर्स सुरू आहेत. पाऊस न पडल्यास येणाऱ्या काळात ही परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. तशी ती होऊ नये यासाठी पावसाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सरकारने आधीच यादृष्टीने पावले टाकणे गरजचे असते.

पुढील पाऊसमान कसे असेल?

महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच पाऊस पडलेला नाही. परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने १६ ऑगस्ट रोजी वर्तवला होता. हवामान विभागाने नुकताच देशभरासाठी पुढच्या २ आठवड्यांचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, १८ ते २४ ऑगस्टदरम्यान देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यानही देशात सरासरीपेक्षा कमी किंवा सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या शेतातील पिकांसाठी मुसळधार पावसाची अत्यंत गरज आहे. हवामान विभागाचा अंदाज पाहिल्यास, पुढचे दोन्ही आठवडे मुसळधार पावसाची शक्यता कमीच दिसून येत आहे. त्यामुळे यंदा राज्यात दुष्काळ पडणार का, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

(हेही वाचा Maratha Reservation : जालन्यात ४ ते १७ सप्टेंबरपर्यंत जमावबंदी)

राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर?

महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे, असे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे सांगतात. कारण राज्यात सरासरीच्या बराच कमी पाऊस झाला आहे. हा हवामान बदलाचा एकूण परिणाम आहे. यंदा मार्च-एप्रिल-मे महिन्यात वाऱ्याचा वेग अतिशय कमी होता. त्याच वेळेस यंदा कमी पाऊस होणार हे कळाले होते. त्यामुळे यंदाचे वर्ष नुकसानकारक ठरणार आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल आणि जुलैमध्ये सरासरीएवढा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज होता. त्यानुसार पाऊस पडला आहे. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे हवामान विभागाने सांगितले होते. त्याचप्रमाणे सध्या मान्सूनचे वर्तन दिसत आहे.

ऑगस्ट महिन्यात साधारणपणे १० दिवस पावसाचा खंड पडत असतो. ११ ते २० ऑगस्ट या कालावधीदरम्यान हा खंड पडतो. सध्या आपण हा खंड अनुभवत आहोत. ज्या पद्धतीने पाऊस पाहिजे त्यापद्धतीने तो पडत नाही, हे खरे आहे. यावर्षी एल निनो सक्रीय आहे. इथून पुढे तो कार्यरत झालेला आहे. याचाच अर्थ आपण दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहोत. ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान एल निनो प्रभाव जाणवणार हे आधीच ठाऊक होते, त्यामुळे जुलैचे १५ दिवस पाऊस झाला आणि त्यापुढे १५ दिवस पाऊस झालाच नाही. एल निनो म्हणजे समुद्राचे तापमान जास्त होते. त्यामुळे बंगालच्या खाडीत आणि मध्य भारतात मान्सूनसाठी जी सकारात्मक परिस्थिती निर्माण होणे गरजेचे असते, ती परिस्थिती निर्माण झाली नाही. आता १५ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होईल, त्यामुळे त्याआधी जर पाऊस कमी झाला तर परतीचा पाऊसही कमी पडेल, त्यामुळे राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे, असे म्हणायला हरकत नाही, असेही प्रा. चोपणे म्हणाले.

दुष्काळसदृश्य परिस्थितीला सरकार कसे तोंड देणार?

पाऊस कमी पडल्यास तीन प्रमुख समस्या उभ्या राहतात. एक म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवतो. दुसरे म्हणजे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करावा लागतो. आणि तिसरे म्हणजे शेतातील पिके वाचवण्याचे मोठे आव्हान असते. १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास नियोजन करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवसात हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अनुषंगाने कृषी तसेच महसूल व संबंधित विभागांनी नियोजन करावे. चारा, वैरण, पिण्याचे पाणी या अनुषंगाने योग्य ते नियोजन तयार ठेवावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. यावरून राज्य सरकारही सांभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थितीचा विचार करू लागले, हे निश्चित!!!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.