कोट्यवधींच्या कथित फसवणुकीप्रकरणी सीबीआय आणि ईडीने २०२० मध्ये अटक केलेल्या डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान यांनी केलेल्या वर्तनाची गंभीर दखल घेत, त्याचे स्थलांतर करण्यात आले आहे. कपिल वाधवान याला तळोजा तुरुंगातून नाशिक तुरुंगात पाठविण्यात आले आहे. तुरुंग अधिकाऱ्यांच्या याचिकेवर विशेष न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली होती. पहाटे वाधवान याचे नाशिक येथील तुरुंगात स्थलांतर करण्यात आल्याचे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले. गैरवर्तणुकीच्या आरोपावरून वाधवान यांची नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून नाशिकला बदली करण्याची मागणी करणारा अर्ज कारागृह विभागाने गेल्या आठवड्यात दाखल केला होता.
उपमहानिरीक्षक (कारागृह), दक्षिण विभाग यांनी सादर केलेल्या नोंदीवरून असे दिसून आले आहे की, वाधवान आणि त्याचा भाऊ धीरज या दोघांना वारंवार राज्य आणि शहराच्या सरकारी रुग्णालयांमध्ये पाठवले जात होते. २६ जून ते २८ ऑगस्ट दरम्यान १५ वेळा वाधवन यांना दोन रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी पाठवण्यात आल्याचा दावा सादर केलेल्या नोंदींमध्ये करण्यात आला. विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे म्हणाले की, वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांनी केलेल्या या निवेदनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. “कपिल वाधवन ज्याला तुरुंग प्राधिकरणाने कधीही कोणताही आजार झाल्याची तक्रार केली नव्हती, त्याला १५ वेळा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, जे गंभीर आहे,” न्यायालयाने म्हटले आहे.
(हेही वाचा – Powai Murder : पवईत प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या, एकाला अटक)
या पार्श्वभूमीवर कारागृह नियमावलीतील तरतुदींनुसार वाधवन यांना नाशिक कारागृहात हलविण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाने घेतला आहे. कारागृह विभागाच्या नोंदींमध्ये असेही म्हटले आहे की उपचारासाठी विशिष्ट विभागात पाठवले असता, वाधवान यांनी रुग्णालयात गेलाच नाही किंवा उपचार घेतले नाहीत आणि संबंधित डॉक्टरांकडून तपासणी न करता तो तुरुंगात परतला होता. एका वृत्तवाहिनीच्या अहवालाचाही संदर्भ दिला. ज्यात दावा केला होता की, वाधवान हे नातेवाईकांना बेकायदेशीरपणे भेटले, त्यांचे खाजगी काम करताना आणि या रुग्णालयात भेटी असताना बाहेरचे अन्न खाताना आढळले. बंधूंना घेऊन जाणाऱ्या सात अधिकाऱ्यांना नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी निलंबित केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community