स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि रत्नागिरीचे अतूट नाते आहे. देशप्रेमाच्या जाज्वल्ल्य भावनेने ओतप्रोत भरलेला कारावास, त्यानंतरची स्थानबद्धता, पतितपावन मंदिराची स्थापना यासारखी त्यांनी केलेली अजोड सामाजिक कामे रत्नागिरीला वेगळी ओळख निर्माण करून देणारी ठरली. १६ मे १९२१ ते ३ सप्टेंबर १९२३ या सव्वादोन वर्षांच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी इथल्या विशेष कारागृहात वास्तव्याला होते. ३ सप्टेंबर १९२३ या दिवशी वीर सावरकर या कारागृहातून मुक्त होऊन आज तब्बल १०० वर्षे पूर्ण झाली. या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सोमवारी, 4 सप्टेंबर रोजी ‘हॅलो सह्याद्री’या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
वीर सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या आणि त्यांच्या शिक्षेच्या कालावधीचा अंत सांगणाऱ्या या दिवसानिमित्त रत्नागिरी विशेष कारागृहाचे तुरुंग अधिकारी अमेय पोतदार यांनी श्रोत्यांशी दूरध्वनिद्वारे सहभाग साधला. स्वातंत्र्यावीराची कारागृहातून मुक्त होण्याची 100वी तिथी या कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली. 1923 साली कारगृहातून मुक्तता झाल्यानंतर पुढील 13 वर्षे वीर सावरकरांचं रत्नागिरीत वास्तव्य होतं. या वास्तव्याच्या प्रभावाविषयी सांगताना अधीक्षक अमेय पोतदार म्हणाले की, फक्त वास्तूवरच नाही, तर रत्नागिरीत सर्वच ठिकाणी तुम्हाला सावरकरांचा विचार जाणवतो. जनमानसावर आजही वीर सावरकरांच्या विचारांचा ठसा उमटलेला दिसतो. मुख्य म्हणजे रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांमध्येसुद्धा त्यांच्या विचारांचा पगडा जाणवतो. या कारागृहात त्यांनी लिहिलेली सर्वच पुस्तक वाचण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कैदी ही पुस्तक वाचून त्यावर निबंध लिहितात. आम्ही या निबंधांना बक्षिसही देतो. अशा प्रकारे इथले कैदी क्रांतीसूर्य सावरकरांच्या स्मृती प्रत्यक्ष जगतात.
महाराष्ट्रात रत्नागिरीत एकच विशेष कारागृह आहे. पोर्तृगिजांनी 1934 साली दारूगोळ्याचं कोठार म्हणून हे कारागृह बांधलेलं होतं. 1953साली इंग्रजांनी या दारूगोळ्याच्या कोठाराचं रुपांतर कारागृहात केलं.वीर सावरकरांना कारागृहातील प्रशासकीय इमारतीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका वेगळ्या खोलीत तिथे ठेवण्यात आलं होतं. तिथे अन्य कुठल्याही कैद्यांना ठेवलं जात नव्हतं. रत्नागिरीच्या कारागृहात आजही प्रशासकीय कारणास्तव ज्यांना बंदी ठेवण्यात येतं त्यांना इतर कैद्यांप्रमाणे सोयीसुविधा देय नसतात. त्यामुळे रत्नागिरीचे हे कारागृह आजही विशेष कारागृह म्हणून कार्यरत आहे. वीर सावरकरांना ठेवलेल्या खोलीत पहिल्यांदा प्रवेश केला की, आपल्याला स्तिमित व्हायला होत. त्या खोलीची लांबी आणि रुंदी 6 बाय 8 इतकी छोटीशी ती खोली आहे.तिथे प्रकाश येण्यासाठी अगदी छोटीशी खिडकी आहे. तिथून अगदी तोकडासा प्रकाश येतो. त्यामुळे ती खोली बघताक्षणी सव्वादोन वर्षांचा कालावधी वीर सावरकर या खोलीत कशा पद्धतीने व्यतीत केला असेल,असा आपल्याला पडल्याशिवाय राहात नाही, अशी इतर कारागृह आणि विशेष कारागृह यांच्या फरकासंदर्भातील माहितीही यावेळी श्रोत्यांना त्यांनी या कार्यक्रमाद्वारे दिली.
शासनाकडे मागणी
यावेळी दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांनी दूरध्वनिद्वारे ‘हॅलो सह्याद्री’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. रत्नागिरीकर नागरिक म्हणून या कार्यक्रमानिमित्त भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ राष्ट्रपुरुष नाही,तर विश्वपुरुष होते. 3 सप्टेंबर 2023 हा दिवस भारतीयांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. याची दखल मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने घेऊन विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. याबद्दल वाहिनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले तसेच या दिवसानिमित्त राज्यातल्या तुरुंग व्यवस्थापनाला पत्र पाठवून 3 सप्टेंबर हा दिवस रत्नागिरीच्या विशेष कारागृहात शासनाच्या वतीने काही विधायक उपक्रमाने साजर कारावा. यामुळे त्याचं स्मरण पुढच्या पिढ्यांना होईल, अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.
दरवर्षी 5000 पर्यटकांची स्मृतिकक्षाला भेट…
1996 सालापासून वीर सावरकरांच्या कारगृहातील खोली स्मृतिकक्ष म्हणून घोषित करण्यात आली. या खोलीबाहेर तसा फलकही लावण्यात आला. ही खोली कारागृह अधीक्षकांच्या परवानगीने कार्यालयीन वेळेत पाहता येते. दरवर्षी 4 ते 5 हजार पर्यटक आणि अभ्यासक ही खोली पाहण्यासाठी रत्नागिरी विशेष कारागृहाला भेट देतात. काही ठराविक शाळा, महाविद्यालये दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांसह या स्मृतिकक्षाला भेट देतात.
संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी व्हिडियोची लिंक खाली देत आहे –
Join Our WhatsApp Community