BMC : तरण तलावांपाठोपाठ आता महापालिका मुख्यालयातही पुस्तक विक्री दालन

100

मराठी भाषेच्या संवर्धन व विकासाच्या दृष्टीने तसेच वाचन संस्कृतीला हातभार लागावा बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आणि चेंबूर येथील जनरल अरुण कुमार वैद्य तरुण तलाव परिसरात पुस्तक विक्री दालने सुरु केल्यानंतर आता महानगरपालिका मुख्यालयाच्या नवीन विस्तारित इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या उपहारगृह परिसरातील पुस्तक विक्री दालनाचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या शुभहस्ते सोमवारी करण्यात आले.

bmc1

मराठी भाषेच्या संवर्धन व विकासाच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या नाट्यगृहे व तरण तलावांच्या परिसरात पुस्तक विक्री दालनास निर्धारित कालावधीसाठी पुस्तक प्रकाशकांना जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या वर्षाच्या सुरुवातीला घेतला होता. त्यानुसार यंदाच्या मराठी भाषा दिनी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते दोन ठिकाणी पुस्तक विक्री दालनांचा शुभारंभ करण्यात आला होता. याच शृंखलेत आता महानगरपालिका मुख्यालयातील पुस्तक विक्री दालनाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला आहे. महानगरपालिका मुख्यालयाच्या नवीन विस्तारित इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या उपहारगृह परिसरातील पुस्तक विक्री दालनाचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या शुभहस्ते सोमवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे, नाट्यगृह व जलतरण तलावांचे समन्वयक संदीप वैशंपायन आणि डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या या पुस्तक विक्री दालनास सोमवारी पहिल्याच दिवशी महानगरपालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांसह अभ्यागतांचाही चांगला प्रतिसाद लाभला.

(हेही वाचा WhatsAppचे नवे फिचर; १० सेकंदाचे पाठवू शकतात व्हिडिओ)

यापूर्वी चेंबूर येथील जनरल अरुण कुमार वैद्य तरण तलाव परिसर, विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहचा परिसर आणि बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह परिसर इत्यादी ठिकाणी पुस्तक विक्री दालने यापूर्वीच सुरू झाली असून त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती या निमित्ताने उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे. तर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील इतर नाट्यगृहे व जलतरण तलाव यासह इतर काही महत्त्वाच्या ठिकाणी देखील पुस्तक विक्री दालने सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती नाट्यगृहे व तरण तलावांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.