मुंबईतील मोठ्या खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची धाव, महापालिकेच्या कोविड रुग्णालयाकडे पाठ!

रुग्णांना अशा मोठ्या आणि प्रसिध्द अशा रुग्णालयांमध्ये दाखल व्हायचे असल्याने एकप्रकारे खाटांची टंचाई जाणवत असली, तरी एका विशिष्ट वर्गानेच निर्माण केलेली टंचाई असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

152

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून याचा ताण मुंबईतील कोरोना उपाययोजना राबवणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर आला आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध होणे अवघड झाल्याचे चित्र आहे. मात्र, हे चित्र केवळ मोजक्याच खाजगी रुग्णालयांमध्ये दिसून येत आहे. कोविडची बाधा झालेले बहुतांशी रुग्ण उच्चभ्रू आणि श्रीमंत वर्गातील असल्याने ते मोजक्याच रुग्णालयांमध्ये जाण्याची इच्छा प्रकट करत आहेत. त्यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार होणे आवश्यक असून त्याकरता पसंतीच्या रुग्णालयाची वाट न पाहता मिळेल त्या रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यात यावेत, असे आवाहन आता महापालिकेच्यावतीने करण्याची वेळ आली आहे.

अडीच हजार खाटा रिकाम्याच

मुंबईमध्ये शनिवारी ९ हजार ९० कोविडबाधित रुग्ण आढळून आले असून, यापूर्वी मागील काही दिवसांपासून अशाप्रकारेच पाच ते साडेआठ हजारांपर्यंत दैनंदिन रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. रुग्णांची वाढ होत असताना उपलब्ध बेडचा वापरही होणे अपेक्षित आहे. पण मागील दोन दिवसांपासून खाटांची कमतरता जाणवू लागली आहे. मात्र, ही खाटांची कमतरता केवळ मोजक्याच खाजगी रुग्णालयांमध्ये जाणवत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून समजते. मुंबईतील इतर खाजगी व महापालिकेच्या कोविड रुग्णालयांसह कोविड काळजी केंद्रांमध्ये आजही आयसीयू सह सर्वसाधारण कक्षातील २ हजार ५०० खाटा रिक्तच असल्याची माहिती समोर येत आहे.

(हेही वाचाः माहीमचे शोभा हॉटेल सील, ११ कामगार कोरोना बाधित)

विशिष्ट वर्गाने निर्माण केलेली टंचाई

एकूण १३ हजार खाटांपैकी महापालिकेसह काही खाजगी रुग्णालयांमध्ये खाटा रिकाम्या आहेत. पण या आजाराची बाधा झालेले रुग्ण हे खाजगी रुग्णालयांमधील जसलोक, ब्रिचकँडी, नानावटी, हिरानंदानी, फोर्टीस, रिलायन्स आदी रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचा आग्रह धरतात. पण सर्वांनाच तिथे दाखल करणे शक्य नाही. तसेच काहींना खाटा उपलब्ध करुन दिल्यानंतर खिडकी जवळची खाट हवी, स्वतंत्र खाट असलेला वॉर्ड हवा, अशाप्रकारची मागणी केली जात असून खाट उपलब्ध करुन दिल्यानंतरही रुग्ण ती खाट नाकारत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अन्य खाजगी रुग्णालय आणि महापालिकेच्या कोविड रुग्णालयांसह काळजी केंद्रांमध्ये आयसीयूसह इतर खाटा रिकाम्या आहेत. केवळ रुग्णांना पंचतारांकित हॉटेलप्रमाणे मोठ्या आणि प्रसिध्द अशा रुग्णालयांमध्ये दाखल व्हायचे असल्याने, एकप्रकारे खाटांची टंचाई जाणवत असली, तरी एका विशिष्ट वर्गानेच निर्माण केलेली टंचाई असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मिळेल त्या रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन

कोणत्याही कोविडबाधित रुग्णांवर प्राथमिक कोविडचे उपचार होणे आवश्यक आहे. मुंबईतील प्रत्येक रुग्णालय मग ते छोटे असो वा मोठे, प्रत्येक ठिकाणी कोविडवरील उपचाराची मार्गदर्शक तत्वे समान आहेत. त्यामध्ये कोणताही बदल नाही. त्यामुळे आपल्या रुग्णावर त्वरित उपचार व्हावा, याकरता मोठ्या रुग्णालयांत खाटा रिकामी झाल्यानंतरच आम्ही रुग्णाला दाखल करू, अशी भूमिका न घेता जिथे मिळेल तिथे दाखल करुन उपचार करुन घ्यावा. रुग्णांवर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. पण अनेक रुग्ण मोठ्या रुग्णालयांमध्ये खाट रिकामी होईपर्यंत घरीच उपचार घेत असतात आणि प्रकृती गंभीर झाली की मग रुग्णालयात धाव घेतात. असे प्रकार टाळण्याचे आवाहन आता महापालिकेकडून केले जाणार आहे.

(हेही वाचाः आजवरची सर्वाधिक रुग्ण संख्या : मार्च महिन्यातच एकूण ८७ हजार ९३८ रुग्ण)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.