मागील शनिवारपासून मुंबईतील प्रत्येक रस्ता आणि चौकांमध्ये लावण्यात येणारे अनधिकृत बॅनर आणि फलक हटवण्याची मोहिम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली असली तरी प्रत्यक्षात या कारवाईमध्ये पक्षपात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मुंबईच्या सुशोभिकरणाला बाधा आणणाऱ्या आणि मुंबईला विद्रुप करणाऱ्या सर्वच बॅनर आणि फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेले असतानाच प्रत्यक्षात अधिकाऱ्यांकडून शिवसेना, भाजप आणि मनसेच्या बॅनरवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे एकप्रकारे या कारवाईत पक्षपात दिसून येत असून अशाप्रकारे कारवाई केल्यास मुंबई बॅनर आणि फलकमुक्त कशी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागील आठवड्यात माझगावसह वांद्रे पूर्व, कलिना सांताक्रुझ आणि अंधेरी आदी भागांमध्ये अस्वच्छता आणि अनधिकृत बॅनरबाजीमुळे बकाल होणाऱ्या मुंबईचे चित्र पाहून चिंता व्यक्त करत मुंबईत स्वच्छता राखली जावी आणि बॅनर काढले जावे अशाप्रकारचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी तातडीने परिपत्रक जारी करत सर्व विभागीय आयुक्त तसेच विभागीय उपायुक्त यांना बॅनर हटवून स्वच्छता मोहिम हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी शनिवार रात्रीपासून बॅनर हटवण्याची मोहिम हाती घेण्याचे निर्देश दिले आहे.
शनिवारपासून मुंबईतील प्रत्येक विभागात बॅनर व फलक हटवण्याच्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर प्रत्यक्षात हे बॅनर हटवण्यात येत असले तरी बऱ्याच भागांमध्ये ही बॅनरबाजी सुरुच आहे. अनेक भागांमध्ये दहिहंडी सरावांचे तसेच दहिहंडीच्या आयोजनाचे विविध पक्षांचे बॅनर तसेच गणपती निमित्त शुभेच्छा देणारे आणि बस सेवा देणारे फलक मोठ्याप्रमाणात प्रदर्शित झालेले पहायला मिळत आहे. शिवाय या कारवाईनंतरही अनेक ठिकाणी बॅनर व फलक प्रदर्शिक करण्याचे प्रकार थांबले नसून महापालिकेच्यावतीनेही अशा जाहिरातींवर कारवाई केली जात नसल्याचेही दिसून येत आहे. अनेक ठिकाणी महापालिकेने कारवाई केल्यानंतरही विविध पक्षांकडून बॅनर लावले जात आहेत. परंतु ही कारवाई करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पक्षपातीपणा केला जात असल्याचेही पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शिवसेना उबाठा गटाच्या वतीने लावण्यात येणाऱ्या फलकांवर कारवाई केली जात आहे, मात्र शिवसेना, भाजप आणि मनसेच्या फलकांवर कारवाई केली जात नाही.
(हेही वाचा – Bharat : भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरही Bharat लिहा; वीरेंद्र सेहवागची बीसीसीआयकडे मागणी)
मनसेचे वरळीतील विभागप्रमुख संतोष धुरी यांनी बॅनर हटवण्याच्या कारवाईत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पक्षपात होत असल्याचा आरोप केला आहे. राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर महापालिका आयुक्तांनी जे आदेश दिले आहेत ते स्वयंस्पष्ट असून त्यामध्ये सरसकट सर्वच बॅनरवर कारवाई करण्याचे नमुद केले आहे. त्यामुळे ठराविक पक्षांचे ठेवायचे आणि दुसऱ्या पक्षांच्या बॅनरवर कारवाई करायचे हे धोरण योग्य नसल्याचे स्पष्ट केले. तसेच या अनधिकृत बॅनरप्रकरणी जेव्हा कारवाई होते. तेव्हा शुभेच्छुकांवर गुन्हा दाखल होण्याऐवजी त्यावर छायाचित्र आहे म्हणून त्या कोणत्याही व्यक्तीवर गुन्हा दाखल करणे योग्य नाही. मागील सरकारच्या काळात केवळ आपला फोटो होता म्हणून आपल्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्यामुळे कोणताही गुन्हा सुडबुध्दीने किंवा आकस मनात बाळगून करू नये असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community