Heema Das Suspension : धावपटू हिमा दास नाडाकडून निलंबित 

भारतीय धावपटू हिमा दासला राष्ट्रीय डोपिंग संस्थेनं निलंबित केलं आहे. वर्षातून तब्बल ३ वेळा तिने ‘व्हेअर अबाऊट्स’ नियमाचा भंग केला आहे

129
Heema Das Suspension : धावपटू हिमा दास नाडाकडून निलंबित 
Heema Das Suspension : धावपटू हिमा दास नाडाकडून निलंबित 

ऋजुता लुकतुके

भारताची स्टार धावपटू हिमा दासला राष्ट्रीय उत्तजेक द्रव्य चाचणी संस्थेनं अर्थात नाडाने तात्पुरतं निलंबित केलं आहे. मागच्या बारा महिन्यात हिमाने व्हेअर अबाऊट्स नियमाचा भंग तीनदा केला असल्याची नाडाची तक्रार आहे. त्यामुळे पुढील चौकशीपर्यंत ती निलंबित असणार आहे. पीटीआयने याविषयीची बातमी दिली आहे.

आगामी आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये दुखापतीमुळे हिमा खेळू शकणार नाही आहे. ‘२३ वर्षीय हिमाने यंदाच्या वर्षी तीन वेळा व्हेअर अबाऊट्स नियम पाळलेला नाही. म्हणून तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली हे खरं आहे,’ असं नाडामधील एका जबाबदार अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे.

काय आहे ‘व्हेअर अबाऊट’ नियम?

२००८ पासून हा नियम जागतिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर अनिवार्य आहे. खेळाडूवर लक्ष ठेवता यावं यासाठी त्याने राष्ट्रीय संघटना तसंच राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी संस्थेकडे आपण नेमके कुठे आहोत याची माहिती देणं अनिवार्य आहे.

खेळाडू स्पर्धेच्या निमित्ताने करत असलेला प्रवास तसंच खाजगी प्रवास आणि तिथे राहण्याचं ठिकाण हे आधीच राष्ट्रीय संस्थेला कळवलेलं असलं पाहिजे. सुरुवातीपासूनच खेळाडूंचा या नियमाला विरोध होता. पण, आता हळू हळू खेळाडूंनी हा नियम स्वीकारलाही आहे. यंदा हिमाने राष्ट्रीय शिबीर अर्ध्यावर सोडलं, तेव्हाही आणि इतर दोन वेळी ती कुठे आहे याचा ठिकाणा तिने नाडाला दिलेला नाही.

जे खेळाडू आंतरराष्ट्रीय नोंदणीकृत चाचणी गटाचा (RTP) भाग आहेत, अशा खेळाडूंना ते कुठे राहतात याचा पत्ता राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेला द्यावा लागतो. एका रात्रीसाठी जरी खेळाडू ती जागा सोडणार असेल तरी ते संस्थेला कळवावं लागतं. त्यासाठी ऑनलाईन एक फॉर्मही आहे, जो भरायचा असतो.

(हेही वाचा – Mirabai Chanu Record : चिनी खेळाडूने मोडला मीराबाई चानूचा विश्वविक्रम)

याशिवाय प्रत्येक दिवसांत एक तासाची वेळ संस्थेला कळवावी लागते, जेव्हा खेळाडू गरज पडल्यास उत्तेजक चाचणीसाठी उपलब्ध होईल. या वेळेत उत्तेजक चाचणीसाठी खेळाडूला बोलावणं आलं तर हजर रहावंच लागतं. यात नियमभंग झाल्यास खेळाडूवर वर्षभरासाठी निलंबनाची कारवाई होऊ शकते. तर व्हेअर अबाऊट्स म्हणजे तुम्ही राहात असलेलं ठिकाण नाही कळवलं, असं तीनदा झालं तर राष्ट्रीय संस्थेकडून या प्रकरणाची चौकशी होते. आणि दोषी आढळल्यास २ वर्षांपर्यंत निलंबन होऊ शकतं. हिमावरही आता तेच संकट आहे. यापूर्वी भारताची कुस्तीपटू सीमा बिसलाला एका वर्षांची शिक्षा झाली होती.

हिमा सध्या दुखापतींशी झुंजतेय

हिमाने देशासाठी २०१८ च्या जाकार्ता आशियाई क्रीडास्पर्धा गाजवल्या होत्या. तिथे तिने ४०० मीटर स्पर्धेत वैयक्तिक रौप्य जिंकलं होतं. तर ४०० मीटर महिलांची तसंच मिक्स्ड रिले स्पर्धेत तिने अनुक्रमे रौप्य व सुवर्ण जिंकलं होतं. तिथून हिमा प्रकाशझोतात आली. पण, पुढे कामगिरीतील सातत्य ती ठेवू शकलेली नाही.

गेली काही वर्षं हिमाला सातत्याने पाठदुखीचा त्रास जाणवत आहे. तर यावर्षी तिचे प्रशिक्षक राधाकृष्ण नायर यांनी तिच्या मांडीचा स्नायू दुखावल्याचंही मीडियाशी बोलताना सांगितलं होतं. त्यामुळे यंदा देशांतर्गत ग्रँडप्रिक्स स्पर्धाही ती खेळू शकलेली नाही. एप्रिलपासून ती उपचार आणि निदान यासाठी वैद्यकीय मदत घेत असल्याचं तिच्या प्रशिक्षकांनी सांगितलं आहे. पण, हे वेळेवर नाडाला न कळवल्याचा फटका तिला बसणार आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.