पुणे महापालिकेच्या आरोग्य पदावर कार्यरत असलेले डॉ. भगवान पवार यांची 5 महिन्यांतच तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मंगळवारी आरोग्य विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता भगवान पवार सहाय्यक संचालक आरोग्य सेवा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम मुंबई येथे रुजू होणार आहेत.
जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांचीही बदली करण्यात आली आहे. हंकारे यांची सहाय्यक संचालक आरोग्य सेवा औद्योगिक विभाग, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख आशिष भारती यांची तातडीने बदली करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. त्यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी डॉ. भगवान पवार यांची 11 मार्च 2023 रोजी दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती, मात्र नियुक्तीच्या 5 महिन्यांच्या कालावधीतच पवार वादग्रस्त ठरले होते.
गेल्या महिन्यात महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष बंगीनवार यांना लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. यासाठी महापालिकेने एक चौकशी समिती नेमली होती. या नेमलेल्या समितीमध्ये डॉ. पवार यांचा समावेश होता. त्यांनी नुकताच चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला होता.या अहवालानंतरच त्यांच्या बदलीची चर्चा रंगली आहे.