G20 बैठकीत झळकणार ऋग्वेदाचे हस्तलिखित

207
नवी दिल्लीतील भारतमंडपम् येथे G20 च्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखरपरिषदेच्या प्रसंगी भरणाऱ्या ‘कल्चरल कॉरिडॉर’ या प्रदर्शनामध्ये प्रत्येक देशाकडून राष्ट्रीय महत्त्वाच्या दोन वस्तू मांडण्यात येणार आहेत. भारतातर्फे या प्रदर्शनात ऋग्वेदाचे हस्तलिखित ठेवण्यात येणार आहे. पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरामध्ये असलेले हे काश्मीरी भूर्जपत्राचे हस्तलिखित सुमारे ५०० वर्षांपूर्वी शारदा लिपीत लिहिलेले आहे.
ऋग्वेदाच्या अतिशय जुन्या आणि शुद्ध हस्तलिखितांपैकी ते एक मानले जाते. त्याचा उपयोग ऋग्वेदाच्या संशोधनाला मोठ्या प्रमाणात झालेला आहे. या प्रदर्शनामध्ये इंग्लंडची सुप्रसिद्ध मॅग्ना चार्टा (मोठी सनद), अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा, आफ्रिकेतील प्रागैतिहासिक मानवाचे अवशेष, इत्यादी महत्त्वाच्या वस्तू मानवाचा ठेवा म्हणून पाहता येतील. ऋग्वेद हा जगात उपलब्ध असणारा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. त्यात मानवाच्या कल्याणाचा विचार, तसेच तत्त्वज्ञान प्रतिबिंबित होते.  G20  परिषदेच्या “वसुधैव कुटुम्बकम्” (सारे विश्व हे एक कुटुंब आहे) या बोधवाक्याशी हा आशय सुसंगत आहे. राजावर नियंत्रण ठेवणारी सामान्य लोकांची “समिती” आणि तज्ज्ञांची “सभा” या दोन आद्य लोकशाही संस्थांचा उल्लेख ऋग्वेदात येतो. त्या अर्थाने ऋग्वेद हा लोकशाहीचा आद्य उद्गार म्हणता येतो. ऋग्वेदाबरोबरच दिल्लीच्या लालबहादुर शास्त्री विद्यापीठामध्ये असणारे पाणिनीच्या अष्टाध्यायीचे हस्तलिखितही या प्रदर्शनामध्ये सांस्कृतिक ठेवा म्हणून ठेवण्यात येणार आहे. भांडारकर संस्थेच्या असिस्टंट क्यूरेटर डॉ. अमृता नातू आणि संशोधन सहायक बाळकृष्ण जोशी यांना ही ऋग्वेदाची प्रत दिल्लीला नेऊन प्रदर्शनाच्या संयोजकांकडे सुपूर्द करण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती. संयोजकांच्या वतीने राष्ट्रीय हस्तलिखित मिशनचे संचालक डॉ. अनिर्वाण दाश यांनी हे हस्तलिखित स्वीकारले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.