मुंबई : अलिकडच्या काही वर्षांत सातत्याने नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या रायगडमध्ये आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुषंगाने महाडमध्ये २०० खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. रायगड जिल्हा मोठा असून डोंगराळ प्रदेशाचा आहे. या जिल्ह्यात नागरिकांना सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी उपरोक्त रुग्णालय उभारणीची कार्यवाही जलदगतीने करा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.
मंत्रालयीन दालनात महाड येथे रूग्णालय उभारण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री डॉ. सावंत आढावा घेतांना बोलत होते. या बैठकीला आमदार प्रविण दरेकर, अप्पर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, सहसचिव अशोक आत्राम, सहसंचालक विजय कंदेवाड, विजय बावीस्कर आदी उपस्थित होते.
(हेही वाचा –I.N.D.I.A. Alliance : झारखंडमध्ये इंडियाच्या जागांसाठी संघर्ष अटळ)
रायगड जिल्ह्यातील परसुळे (ता. पोलादपूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात निधीची उपलब्धता आणि कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत आशा कार्यकर्त्या यांना विमा संरक्षण देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या. तसेच १८ वर्षांवरील पुरूषांची आरोग्य तपासणी मोहिम, आपला दवाखाना रूग्णसंख्या व सद्यस्थिती, खरेदी प्राधिकरण, धर्मदाय रूग्णालय ॲप, आरोग्य विभागाचे नविन मंडळ कार्यालय स्थापन करणे आदीं विषयांवर चर्चा या बैठकीत करण्यात आली. बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community