गेल्या पंधरा दिवसांत साखर तब्बल तीन टक्क्यांनी महाग झाली आहे. सध्या टनामागे ३७ हजार ७६० रुपये मोजावे लागत असून, किरकोळ बाजारात साखरेचे दर किलोमागे ४२ ते ४५ रुपयांवर गेलेत. गेल्या ६ वर्षांतला हा उच्चांक असल्याचे समजते. २०१७ नंतर साखरेचे हे सर्वोच्च दर ठरलेत. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर चढेच आहेत.
देशभरात कमी पडलेला पाऊस, उसाचे घटलेले उत्पन्न पाहता ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे दर अजून भडकण्याची भीती व्यक्त होतेय. पाकिस्तानात तर एक किलो साखरेसाठी सध्या चक्क दोनशे रुपये मोजावे लागत आहेत. यंदा उभ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. देशभरात अनेक ठिकाणी पावसाने हुलकावणी दिलीय. त्यामुळे उसाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात उसाचे उत्पन्न घटू शकते. येणाऱ्या हंगामात साखरेचे उत्पन्न तब्बल ३.३ टक्क्यांनी घटून ते ३.१७ कोटी टन होऊ शकते. हे सारे ध्यानात घेता आगामी काळात साखरेचे दर आणखी महागण्याची भीती व्यक्त होतेय.
(हेही वाचा – Cases In Mumbai : एका गुन्ह्याची उकल करताना, मुंबईतील २७ प्रकरणाची उकल )
जगातही भडका
आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर महागलेत. थायलंड, इंडोनेशियामध्ये साखरेचे दर वाढलेत. दुसरीकडे, यूएसडीएने साखरेचा जागतिक साठा १३ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहचल्याचे नुकतेच जाहीर केले होते. महागाईने पिचलेल्या पाकिस्तानमध्ये तर तेल, वीज आणि पीठानंतर साखरही महागली असून, दर किलोमागे २०० रुपयांच्या पुढे गेलेत. जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत सध्या भारतात साखरेचे दर कमी आहेत. मात्र, येणाऱ्या काळात वाढू शकतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community