मुंबई : देशभरातील लहान सहान पक्षांची मोट बांधून मोदींविरोधात आघाडी तयार करणाऱ्या काँग्रेसने नुकतीच आपल्या पक्षाची राष्ट्रीय निवडणूक कार्य समिती घोषित केली. मात्र, त्यात महाराष्ट्रातील एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश खालोखाल सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्राकडे अशाप्रकारे दुर्लक्ष करून हायकमांडला नेमके काय साध्य करायचे आहे, अशी चर्चा प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू झाली आहे.
काँग्रेसच्यावतीने नुकतीच राष्ट्रीय निवडणूक कार्यसमिती जाहीर करण्यात आली. त्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधी या मायलेकांसह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील नेते अधिरंजन चौधरी, के. सी. वेणुगोपाल आणि इतर मिळून १६ प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. परंतु, महाराष्ट्रातील एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही.
गेल्या लोकसभेला काँग्रेसने जाहीर केलेल्या समितीत मुकुल वासनिक महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत होते. मात्र, आता त्यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या ऐवजी अशोक चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता होती. मात्र, त्यातील एकाचाही विचार हायकमांडने केलेला नाही.
(हेही वाचा –Water Storage : सर्व धरणातील पाणी साठ्यात वाढ: संभाव्य पाणी कपात टळणार)
काँग्रेसच्या निवडणूक समितीत कोण?
मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, अंबिका सोनी, अधीर रंजन चौधरी, सलमान खुर्शीद, मधुसूदन मिस्त्री, उत्तम कुमार रेड्डी, टीएस सिंग देव, के. जे. जॉर्ज, प्रीतम सिंग, मोहम्मद जावेद अमीन यज्ञीक, पी. एल. पुनिया, ओमकार मार्कम, के. सी. वेणूगोपाल
महाराष्ट्रातील गटबाजी जबाबदार
– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या तीन गट पडले आहेत. नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील सुप्त संघर्षामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यातील एकाला संधी द्यावी, तर दुसरा गट नाराज होईल, अशी भीती हायकमांडला आहे.
– काँग्रेसच्या निवडणूक कार्य समितीचे काम हे मुख्यत्वे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील योग्य उमेदवारांची निवड करून त्याचा अहवाल हायकमांडला सादर करण्याचे आहे. मात्र, महाराष्ट्रातील गटबाजीत कुणा एकाला संधी दिल्यास तो दुसऱ्या गटावर कुरघोडी करण्याची संधी सोडणार नाही.
– त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो, ही बाब ध्यानात घेऊन हायकमांडने एकालाही राष्ट्रीय निवडणूक कार्य समितीत घेतलेले नाही.
Join Our WhatsApp Community