मुंबई : मुंबई-ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली दहीहंडी गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे रणशिंग फुंकणारे असल्यामुळे या उत्सवाला राजकारणाची झालर चढताना पहायला मिळाली. मानाच्या हंड्यांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो ठळकपणे झळकत होते. विशेष म्हणजे एकनाथ ‘भाईं’सोबत, देवेन ‘भाऊ’ही एखाद्या सिने सेलिब्रिटीसारखे प्रत्येक हंडीला उत्साहाने भेट देत होते. परंतु, बॅनरवर झळकणारे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत नसल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. त्यामुळे सर्व मोठ्या कार्यक्रमांना ठाण्यातील सगळे चौक आणि गल्लोगल्ली शिंदेंचे बॅनर लक्षवेधी ठरतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ते आणि शिवसेनेतील फुटीआधी उद्धव ठाकरे शिंदेंच्या बॅनरवर झळकायचे. यावर्षी एका नव्या फोटोची त्यात भर पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची.
(हेही वाचा-New Comet : जपानी खगोल अभ्यासकाने लावला नव्या धूमकेतूचा शोध, 12 सप्टेंबर रोजी पहाटे देणार दर्शन)
केवळ टेंभी नाकाच नव्हे, संकल्प प्रतिष्ठान, स्वामी, गोकुळनगर आदी ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो झळकले होते. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या पंक्तीमधील अजित पवार साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे ते किमान ठाण्यातील हंड्यांना हजेरी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पवार तिकडे फिरकलेच नाहीत. मुंबईत असतानाही त्यांनी पाठ फिरवल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला.
कारण काय?
अजित पवारांच्या दहीहंडीतील अनुपस्थितीविषयी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना विचारले असता, ते आजारी असल्यामुळे बाहेर पडले नाहीत, असे सांगण्यात आले. मात्र, मराठा आरक्षणाचा विषय चिघळत असल्यामुळे पवारांनी दहीहंडीमध्ये सहभागी होण्याचे टाळल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community